Wed, May 22, 2019 15:21होमपेज › Nashik › आमच्याकडे जो मांजा आहे; तो कुणाकडेच नाही: गिरीश महाजन

'आमच्याकडे जो मांजा आहे; तो कुणाकडेच नाही'

Published On: Jan 16 2018 2:14AM | Last Updated: Jan 16 2018 2:14AM

बुकमार्क करा
येवला : प्रतिनिधी

राजकारणाच्या पतंगामध्ये आम्ही निश्‍चितच वरचढ आहोत. भारतीय जनता पक्षाच्या पतंगापुढे कुठलाही पतंग उडू शकत नाही, सगळ्यांच्या पतंगाची दोरी आम्ही कापलेली आहे. सध्या भाजपाचा मांजा जोरात असून, दुसर्‍या कोणाकडेच आमच्यासारखा मांजा नाही, असे म्हणत गिरीश महाजन यांनी येवल्यातील प्रसिद्ध पतंगोत्सवाला हजेरी लावून जोरदार पतंगबाजी केली. सोमवारी करीदिनाच्या दिवशीच ‘राजाश्रयाअभावी पतंगोत्सवाची हवा गुल, भुजबळांच्या गैरहजेरीत रौनक फिकी’ असे वृत्त ‘पुढारी’ने प्रसिद्ध केले होते. त्या वृत्ताची दखल घेत व स्थानिक भाजपा युवा नेते समीर समदडिया यांच्या तातडीच्या निमंत्रणावरून पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येवल्यातील पतंगोत्सवात हजेरी लावली.

सोमवारी (दि. 15) दुपारी तीनच्या दरम्यान पालकमंत्री महाजन यांचे आगमन भाजपा युवानेते समीर समदडिया यांच्या घरी झाले. यावेळी पालकमंत्री महाजन यांनी दोन वर्षांपूर्वीसुद्धा आपण या ठिकाणी आलो होतो, असे सांगत पतंगबाजीचा आनंद लुटण्यासाठी येवलेकरांना शुभेच्छा देण्यासाठी आपण मुद्दामहून येथे आलेलो आहे, असे नमूद करीत येवल्याच्या पतंगोत्सवाचा आनंद घेत येवलेकरांशी काटाकाटी खेळली. यावेळी पालकमंत्र्यांची पतंग कट्टर पतंगबाज असलेल्या येवलेकरांनी दोन-तीन वेळेस कापली. यावर पालकमंत्री महाजन यांनी हा खेळाचाच भाग असून, या पतंगाकडे तुम्ही लक्ष देऊ नका, राजकारणाच्या पतंगामध्ये आम्ही निश्‍चितच वरचढ आहोत.

भारतीय जनता पक्षाच्या पुढे कुठलाही पतंग उडू शकत नाही, सगळ्यांना आम्ही कापणार आहोत, असे आत्मविश्‍वासाने सांगत पुन्हा पतंगबाजी केली. तर शिवसेनेचे विधान परिषदेचे संभाव्य उमेदवार व जिल्हा बँकेचे माजी चेअरमन नरेंद्र दराडे, माजी व्हा-चेअरमन सुहास कांदे यांनीही पालकमंत्र्यांच्या साथीने पतंगबाजीचा आनंद लुटला. देशभरात भाजपाच्या पतंगाचीच भरारी असून, आम्ही सर्वत्रच सगळ्यांचे पतंग कापलेले असून, आमच्याकडे जो मांजा आहे तो कुणाकडेच नाही. त्यामुळे इतरांचे पतंग कटणार आहे, असे सांगत देशातील प्रत्येक निवडणुकांमध्ये भाजपा विजयी घोडदौड करीत आहे. त्यामुळे आता देशात सर्वात उंच पतंग भाजपाचाच असणार हे येत्या निवडणुकांमध्ये पुन्हा दिसेल, असेही पालकमंत्री महाजन म्हणाले.