Thu, May 23, 2019 15:13
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › वैष्णवांच्या ध्वजपताकांनी महामार्ग भगवामय

वैष्णवांच्या ध्वजपताकांनी महामार्ग भगवामय

Published On: Jan 11 2018 1:08AM | Last Updated: Jan 10 2018 10:26PM

बुकमार्क करा
सिन्‍नर : प्रतिनिधी

राज्याच्या पूर्व व दक्षिणेकडील विविध जिल्ह्यांतून शुक्रवारी (दि. 12) षटतिला एकादशीला श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथे होणार्‍या श्री संत निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रेमुळे नाशिक-पुणे महामार्ग नाथनामाच्या जयघोषाने दणाणून गेला होता. तालुक्यातील त्र्यंबकेश्‍वरकडे जाणारे सर्व रस्ते जणू भगवेमय झाले आहेत.

सुगंधी व विविधरंगी पुष्पमालांनी सजविलेल्या वृषभ रथांच्या पालख्या, मुखी ग्यानबा-तुकाराम व नाथनामाचा जयघोष, घणघणत्या टाळांचा लयबद्ध नाद, मृदंगाची कर्णमधुर धीरगंभीर ताल या संगीतयोगावर कंठातून निघणार्‍या भजनांमध्ये तल्लीन होऊन लयबद्ध पदचालीने आणि खांद्यावरील फडफडणारे झळमळीत भगवे ध्वज सांभाळत हर्षोल्हीत वैष्णवांच्या दिंड्या त्र्यंबकेश्‍वरकडे नाथभेटीच्या ओढीने झपाझप चालू लागल्या आहेत. 

जिल्ह्यातील पूर्व भागातून तसेच अहमदनगर, पुणे जिल्ह्यांतून निघालेल्या वारकर्‍यांच्या दिंड्या बुधवारी मुक्‍काम करून पहाटे नाशिककडे रवाना झाल्या. शिर्डी, लोणी रस्ता, पुणे महामार्गासह विविध भागातून सिन्‍नर येथे एकत्र आल्या होत्या. रहाता तालुक्यातील साकुरी, संगमनेर तालुक्यातील साकूर मांडवे, आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी, अकोले, कोपरगाव, राहता, पानेगाव आदी तालुक्यांतून आलेल्या दिंड्या समावेश होता.

पुणे महामार्गानेच अधिक दिंड्यांचे प्रस्थान झाले असले तरी सिन्‍नर येथून पास्तेमार्गे विंचूरदळवी, भगूरमार्ग, खडांगळी येथील दिंडी नायगावमार्गे शिंदे पळसे मार्गे नाशिकला पोहोचली. अकोले तालुक्यातून म्हैसवळण रस्त्याने पिंपळगाव डुकरा मार्गे, तर काही दिंड्या पांढुलीमार्गे थेट अंजनेरी रस्त्याने मार्गक्रमण करीत आहेत. त्यामुळे त्र्यंबकेश्‍वरकडे येणारे चोहूबाजूचे रस्ते वैष्णवांच्या दिंड्यांनी  भगव्या पताकांच्या रंगात न्हाऊन निघाले आहेत. धोतर-फेट्यावाल्या वृद्ध, तरुण, तरुणी व महिलांची संख्याही लक्षणीय आहेत. प्रत्येक मुक्‍कामाच्या ठिकाणी वारकर्‍यांना कीर्तनाच्या श्रवणभक्‍ती योगाचा आनंद लाभत असून, पुण्यकर्मासाठी गावोगावी दानशुरांकडून वारकर्‍यांच्या चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.

भक्‍तियोगातील शहरी व ग्रामीण संस्कृतीचे दर्शन

नाशिक-पुणे महामार्गाने त्र्यंबकेश्‍वरकडे जाणार्‍या अनेक दिंड्या त्र्यंबकेश्‍वरकडे सरकत होत्या. त्याचवेळी मुंबई, पालखर, डहाणूकडून शिर्डीकडे जाणार्‍या दिंड्याची नाशिक ते सिन्‍नरदरम्यान भेटीगाठी झाल्या. डोक्यावर गांधी टोपी, सफेद धोतर व सदरा व खांद्यावर भगवी पताका अशा वेशातील वारकर्‍यांच्या दिंडीत टाळृमृदंगाचा गजर, मुखी हरिनामाच्या सुमधुर भजनाचा मंगलमय सूर, तर तरुण साईभक्‍तांचा टी-शर्ट, बर्मुडा पॅन्ट व पायात वॉकिंग शूज व डीजेच्या तालावर वाजणारे भक्‍तिगीते या दोन्ही भक्‍तियोगातील पदयात्रेकरूंच्या दोन वेगवेगळ्या शहरी व ग्रामीण संस्कृतीचे दर्शनही नाशिक-सिन्‍नरदरम्यान प्रवाशांना झाले.