Wed, Apr 24, 2019 11:31होमपेज › Nashik › येवल्याच्या तहसीलदारांना महिलांकडून आंब्यांची भेट!

येवल्याच्या तहसीलदारांना महिलांकडून आंब्यांची भेट!

Published On: Jun 16 2018 7:56AM | Last Updated: Jun 16 2018 7:56AMयेवला : प्रतिनिधी

माझ्या शेतातील आंब्याच्या झाडाचे आंबे खाल्ले की अपत्यप्राप्ती होते असे बेताल व अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे वक्‍तव्य करणार्‍या संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा येवल्यात महिलांच्या वतीने तहसीलदारांना आंबे भेट देऊन निषेध नोंदवण्यात आला. स्त्री जातीची खिल्ली उडवून अपमान केल्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी महिलांनी केली आहे.

संभाजी भिडे यांची नाशिक येथे सभा झाली. या सभेत त्यांनी काही वादग्रस्त वक्तव्ये केली. माझ्या शेतातील आंबा खाल्ल्यास अपत्यप्राप्ती होते. आतापर्यंत 180 हून अधिक जोडप्यांना मी हा आंबा दिला. त्यातील दीडशे जणांना अपत्यप्राप्ती झाली असल्याचा दावा भिडे यांनी केला. मात्र याविषयी आता जोरदार संताप व्यक्त होत आहे. आंबे खाऊन मुले होतात असा दावा करणे हे जादुटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा आहे. नागरिकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवायलाहवा, पण भिडेंचे हे वक्तव्य पाहता त्यांचा संविधानावर विेशास नसल्याचे दिसते. तसेच या देशात मनुस्मृती लागू करण्याचे काम ते करत आहेत.

गुरुजी आपल्याला कुठल्या युगात नेऊ इच्छितात, असा सवाल करून संत तुकारामांच्या अभंगाचा दाखला देत पोलिसांनी याची दखल घ्यायला हवी. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी यावेळी महिलांनी केली आहे. या वक्तव्याने भिडे यांनी स्त्री जातीची खिल्ली उडवून अपमान केला असून अंधश्रद्धांना खतपाणी घालणार्‍या भिडेंच्या वक्तव्याचा निषेध नोंदवून त्यांच्या सभांवर बंदी घालण्याची यावी व भिडेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीचे निवेदन तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांना आंब्यासह देण्यात आले.