Tue, Mar 26, 2019 01:40होमपेज › Nashik › बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

चाळीसगाव : प्रतिनिधी

गिरणा परिसरात बिबट्याच्या हल्लयात एका महिलेचा मृत्यू झाला. आतपर्यंत या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात पाच बळी गेले आहेत. यात २ लहान मुले तर २ महिलांचा समावेश आहे. 

बिबट्याने केलेल्या हल्लयात सुसाबाई धना भिल (वय ५५) या ठार झाल्या. त्यांच्या डोक्याकडील भाग बिबट्याने खाल्ला होता. गिरणा परिसरातील शिवारात काम करत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यापूर्वी बिबट्याने २ महिला आणि २ लहान मुलांना लक्ष केले होते. या घटनेने स्थानिक शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्यात वाढ झाली आहे. त्यामुळे बिबट्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

गेल्या चार ते पाच महिन्यांपासून चाळीसगाव तालुक्यात बिबट्याची दहशत सुरू आहे. माणसांसह जनावरांवर हल्ला करण्याच्या घटना ताज्या असताना शनिवारी(२५) रात्रीच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील लोंढे शिवारातील शेतात बांधलेल्या वासरीवर बिबट्याने हल्ला केला होता. यावेळी गोऱ्ह्यावर हल्ला करून त्याची मानच तोडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे शेतकरी व ग्रामस्थ भयभीत झाले असून आतापर्यंत दोन महिला, दोन मुले अशा चार जणांचा मृत्यू झाला तर इतर पाच जण जखमी झाली आहेत.  वनविभागाला हा बिबट्या पकडण्यास अपयश येत असल्याने वनविभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.