Thu, Jan 17, 2019 05:59होमपेज › Nashik › बाळाला रेल्‍वे रूळावर सोडून मातेची आत्‍महत्‍या 

बाळाला रेल्‍वे रूळावर सोडून मातेची आत्‍महत्‍या 

Published On: May 11 2018 2:14AM | Last Updated: May 11 2018 2:14AMनांदगाव : मारुती जगधने  

मानसिक रुग्ण असलेल्या एका २४ वर्षीय मातेने आत्महत्या करताना ९ महिन्याच्या आपल्या काळजाच्या तुकड्याला मात्र, बाजूला केले. जागतिक मातृ दिन सप्ताह एकीकडे साजरा होत असतांना या मातेने आपले मातृत्व मरणाच्या शेवटच्या क्षणी देखील जपलं. उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना नांदगावच्या रेल्वे फाटका जवळ घडली.

या बाबत अधिक माहिती अशी की, जामदरी ( ता.नांदगाव ) येथील मनोरुग्ण असलेली रेणुका पगारे ही महिला आपल्या ९ महिन्याच्या तान्हुल्याला घेऊन रेल्वे फाटकाजवळ फिरत होती. आज (१० मे)सकाळी मनमाडकडे जाणाऱ्या सचखंड एक्सप्रेसने नांदगाव स्टेशन सोडले आणि फाटकाजवळून स्पीड पकडणार तेवढ्यात रेणुका पगारे आपल्याकडील ९ महिन्याच्या तान्हुल्याला रेल्वे रुळावर बाजूला ठेवून स्वतः मात्र रेल्वे रुळावर झोपली आणि गाडीखाली सापडून आपली जीवन यात्रा संपवली. अगदी मरण समोर पत्करतांना देखील तिचे मातृत्व जागे झाले आणि क्षणाचाही विचार न करता स्वत:ला रेल्वे रुळावर झोकून दिले. 

जागतिक मातृत्व दिनाच्या पूर्व संध्येला घडलेल्या या प्रकाराने एका आईचं मातृत्व पुन्हा सिद्ध झाले. गुरुवारचा बाजार असल्याने मोठी वर्दळ आज रेल्वे फाटकात होती पण घडलेला हा प्रकार बघून अनेकांच्या काळजाचा ठोका तर चुकलाच पण डोळ्यांच्या कडाही पाणावल्या. घटना घडल्यानंतर तिच्यात थोडासा जीव होता. पुढील उपचारासाठी तिला मालेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले असता उपचार घेत असतांना तिची प्राणज्योत मालवली. ९ महिन्याच्या त्या तान्हुलीला मग रेल्वे पोलिसांनी जामदरी येथील तिच्या आजी बाबांच्या ताब्यात दिले.