Thu, Jun 20, 2019 20:47होमपेज › Nashik › सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Published On: May 07 2018 2:03AM | Last Updated: May 06 2018 11:19PMसिन्‍नर : प्रतिनिधी

तालुक्यातील हिवरगाव येथील विवाहितेने शेततळ्यात आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.6) पहाटे 5 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.कविता साईनाथ ढेपले (24) असे मृत विवाहितेचे नाव आहे. घर बांधण्यासाठी 50 हजार रुपये आणावेत या कारणासाठी तिचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंचाळे येथील बाबूराव सैंद्रे यांची मुलगी असलेल्या कविता हिचा पाच ते सहा वर्षांपूर्वी हिवरगाव येथील साईनाथ उर्फ रंगनाथ ढेपले याच्याबरोबर विवाह झालेला होता. मात्र, घर बांधण्यासाठी 50 हजार रुपये आणावेत या कारणासाठी तिला वेळोवेळी शिवीगाळ तसेच मारहाण करून उपाशीपोटी ठेवले जात होते. तिचा शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद कविताचा भाऊ सोमनाथ बाबूराव सैंद्रे (25, रा. पंचाळे) याने पोलिसात दिली आहे. त्यावरून पोलिसांनी साईनाथ ढेपले, सासरे केरू भनाजी ढेपले, सासू अनुसयाबाई केरू ढेपले, भाया भाऊसाहेब केरू ढेपले, दीर कृष्णा केरू ढेपले (सर्व रा. हिवरगाव) यांच्या विरोधात हुंड्यासाठी छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक हरिभाऊ कोल्हे, उपनिरीक्षक डी. बी. आवारे यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलीस उपअधीक्षक अतुल झेंडे यांनीही घटनास्थळी भेट दिली. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. हिवरगाव येथे शोकाकुल वातावरणात कविता ढेपले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.