Tue, Jul 16, 2019 12:22होमपेज › Nashik › ट्रीगार्डविना वृक्षलागवडीस नकार

ट्रीगार्डविना वृक्षलागवडीस नकार

Published On: Jul 13 2018 12:50AM | Last Updated: Jul 12 2018 11:51PMनाशिक : प्रतिनिधी

वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत मनपामार्फत लावण्यात येणार्‍या 12 हजार वृक्षलागवडीस हरकत घेत ट्रीगार्ड असल्याशिवाय लागवड करण्यात येऊ नये, अशी भूमिका स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी घेतली. परंतु, 31 जुलैपर्यंत वृक्षलागवड करावयाची असल्याने सभापती हिमगौरी आडके यांनी प्रस्ताव मंजूर करत सदस्यांनी केेलेल्या उपसूचनांचा त्यात समावेश करण्याची सूचना केली. 

शासन आदेशानुसार 1 ते 31 जुलै या कालावधीत 12 हजार वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट मनपाला देण्यात आले आहे. एप्रिल महिन्यापासून याबाबतची कार्यवाही सुरू असली तरी शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली. त्यामुळे निविदा प्र्रक्रिया राबविण्यास विलंब झाला. 

याबाबत सदस्यांनी शासनाच्या धोरणावर तसेच, प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीवर आरोप करत अधिकारी खोटी माहिती देत ठेकेदाराची पाठराखण करत असल्याचा आरोप केला. दोन कोटी 66 लाख रुपये खर्च करण्यात येणार असून, त्याअंतर्गत 10 फुटापेक्षा अधिक उंचीचे वृक्षलागवड करून 18 महिने ठेकेदाराकडून देखभाल केली जाणार असल्याचे उद्यान विभागाचे अधिकारी तिवारी यांनी सांगितले. 

त्यावर अठराच महिने का आणि 20 एप्रिल रोजी मनपा कर्मचार्‍यांनी खड्डे खोदले असतील तर आतापर्यंत संबंधित 12 हजार खड्डे राहिले असतील का असा प्रश्‍न सुषमा पगारे आणि संतोष साळवे यांनी उपस्थित केले. तसेच, वृक्षलागवड करताना ट्रीगार्ड आहे का अशी विचारणा दिनकर पाटील यांनी केली. त्यावर दहा फुटी उंचीचे वृक्ष असल्याने संरक्षक जाळीची गरज नसल्याचे तसेच बांबूचे वेष्टण लावले जाणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. परंतु, सदस्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी ट्रीगार्डशिवाय वृक्षलागवड करू नये, अशी भूमिका घेत विषय तहकूब ठेवण्याची मागणी केली. त्यावर शासनाचा कार्यक्रम असल्याने तसेच, 31 जुलैपर्यंत वृक्षलागवड करावयाची असल्याने विषय तहकूब ठेवता येणार नाही. यामुळे सदस्यांच्या उपसूचना विचारात घेऊन प्रस्ताव मंजूर करण्यात येत असल्याचा निर्णय सभापती हिमगौरी आडके यांनी घेतला.