Wed, Jul 08, 2020 01:02होमपेज › Nashik › पत्नीचा गळा चिरून खून

पत्नीचा गळा चिरून खून

Published On: Jan 17 2018 2:02AM | Last Updated: Jan 16 2018 10:56PM

बुकमार्क करा
चांदवड : वार्ताहर

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या मानेवर धारदार शस्त्राच्या सहाय्याने वार करून पत्नीचा निर्घृण खून केला. पत्नी मृत झाल्याचे समजताच पतीने पिकांवरील कीटकनाशकांवर फवारले जाणारे नुऑन नावाचे विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पतीला दवाखान्यात नेण्यात आले असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंदर्भात वडनेरभैरव पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील बहादुरीवाडी शिवारातील रहिवासी बाळासाहेब आनंदा जाधव (52) व पत्नी सायजाबाई  (45) हे मुलगा सुदाम व सून योगिता यांच्यासोबत राहतात.  बाळासाहेब  सायजाबाईच्या चारित्र्यावर संशय घेत असत. यावरून सोमवारी (दि.15) मध्यरात्रीच्या सुमारास या दोघांत भांडण झाले. या भांडणात पती बाळासाहेब याने पत्नी सायजाबाई यांच्या मानेवर तीक्ष्ण व धारदार शस्त्राच्या सहाय्याने वार केल्याने सायजाबाई यांचा जागीच मृत्यू झाला. पत्नी मयत झाल्याचे पाहून पतीने  विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  त्रास होऊ लागल्याने ते उलट्या करीत होते. त्यांच्या  आवाजाने  पडवीत झोपलेला मुलगा सुदाम, सून योगिता यांना जाग आली. त्यावेळी त्यांनी घरात धाव घेतली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. यावेळी सुदाम यांनी शेजार्‍यांच्या मदतीने बाळासाहेब यांना वणी येथील दवाखान्यात उपचारासाठी नेले. त्यानंतर  जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.  घटनेची माहिती मिळताच वडनेरभैरवचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, उपनिरीक्षक अभिजित जाधव, अरुण पाटील,  हवालदार शिवाजी लगड, पोलीस नाईक संतोष वाघ, कॉन्स्टेबल मच्छिंद्र कराड, पोलीसपाटील जगन्‍नाथ शिंदे आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.  घटनेची माहिती मिळताच मालेगावचे पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे यांनी घटनास्थळी पाहणी करीत नातेवाइकांची विचारपूस केली. मयत महिलेच्या पश्‍चात दोन मुले, चार मुली, सून असा परिवार आहे. वडनेरभैरवचे सहायक निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजित जाधव तपास करीत आहेत.