Tue, Nov 20, 2018 06:22होमपेज › Nashik › सिडकोत पती-पत्नीची  विष घेऊन आत्महत्या

सिडकोत पती-पत्नीची  विष घेऊन आत्महत्या

Published On: Jun 15 2018 11:48PM | Last Updated: Jun 15 2018 11:47PMसिडको : प्रतिनिधी

पाच सावकारांच्या जाचाला कंटाळून पती-पत्नीने विषारी औषध प्राशन करीत आत्महत्या केल्याचा धक्‍कादायक प्रकार शुक्रवारी (दि. 15) घडला. आत्महत्या केलेल्या दाम्पत्याने लिहून ठेवलेल्या ‘सुसाइड नोट’नुसार अंबड पोलिसांनी पाच सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केवल पार्क परिसरातील अष्टविनायकनगर येथील कमल रेसिडन्सीमध्ये वासुदेव अंबादास जाधव (38) व संगीता वासुदेव जाधव (34) हे दाम्पत्य राहत होते. वासुदेव हे मजूर ठेकेदारीचा व्यवसाय करीत होते. त्यांनी व्यवसायासाठी अशोक केदू होळकर, सुनील पूरकर, राहुल जाधव, प्रवीण भाऊ (रा. वेद मंदिर परिसर, त्र्यंबक रोड) व अमोल सोनवणे यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. या सावकारांनी जाधव यांच्याकडे पैसे परत देण्याचा तगादा लावला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जाधव दाम्पत्य तणावात होते. त्यातच काही दिवसांपूर्वी वासुदेव यांचा अपघात होऊन ते गंभीर जखमी झाले होते. मात्र, त्यानंतरही सावकारांकडून पैशांचा तगादा थांबला नव्हता. त्यांच्याकडे कर्जाच्या रकमेची मागणी सतत सुरूच होती. अखेर या प्रकाराला कंटाळून जाधव दाम्पत्याने शुक्रवारी दुपारी विष प्राशन करून आत्महत्या केली.

जाधव यांचे आतेभाऊ समाधान पवार यांना हे वृत्त कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता, या दाम्पत्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. ‘पाचही सावकारांकडून घेतलेले पैसे परत केलेले असतानाही त्यांनी खोट्या केसेस करण्यासह जिवे मारण्याची धमकी दिली होती. या तणावामुळे आत्महत्या करीत आहोत’ असे या चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार अंबड पोलिसांनी पाचही सावकारांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पवार करीत आहेत.