Sun, May 26, 2019 20:39होमपेज › Nashik › खानदेशनामा  : रखडलेले प्रकल्प मार्गी लागणार केव्हा?

खानदेशनामा  : रखडलेले प्रकल्प मार्गी लागणार केव्हा?

Published On: Feb 11 2018 12:56AM | Last Updated: Feb 10 2018 11:16PMधों. ज. गुरव

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंची खंत हा विषय सध्या महाराष्ट्रभर गाजत असतानाच अमळनेर नपाच्या नगराध्यक्षासह भाजपाच्या 22 नगरसेवकांच्या गच्छंतीने राजकीय धुरळा उडतो आहे. धुळे जिल्ह्यातील  शेतकरी धर्मा पाटील (84) यांच्या मंत्रालयातील आत्महत्येचे तर देशभरात पडसाद उमटले. विद्यमान सरकार शेतकरीविरोधी असल्याचे भांडवल करून सर्व विरोधी पक्ष एकवटले. आत्महत्याग्रस्त धर्मा पाटील यांच्या विखरण गावाला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आदी पक्षांच्या बड्या नेत्यांनी भेटी दिल्या. रास्ता रोकोही करण्यात आला. शासनाच्या लेखी आश्‍वासनानंतर धर्मा पाटलांचा मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतला. विखरणला झालेल्या अंत्यसंस्काराच्या वेळी मोठा जनसमुदाय जमला होता. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिकांनी पर्यटनमंत्री व नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यावर तोफ डागली. प्रकल्प बाधित क्षेत्रातील जमिनी नाममात्र किमतीला खरेदी करून कोट्यवधीचा मलिदा खाण्याचा रावल कुटुंबीयांचा धंदा असल्याचा आरोप केला. त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली. रावलांनी मलिकांवर गुन्हा दाखल करून कोर्टात धाव घेतली आहे.

धुळे-दौंडाईचा रस्त्यावर देवाचे विखरण हे मयत धर्मा पाटलांचे गाव 2007 मध्ये विखरण व मेथी शिवारात 1300 मेगावॉटचा कोळशावरील विद्युतनिर्मिती करावयाचा प्रकल्प तत्कालीन शासनाने हाती घेतला. परंतु, त्यानंतर हा प्रकल्प सोलरमध्ये परावर्तित करण्यात आला. प्रकल्पासाठी शासनाने जमीन संपादित करताना शेतकर्‍यांंना जो मोबदला दिला. त्यात झालेल्या भ्रष्टाचाराने धर्मा पाटलांचा बळी घेतला. जमिनीचा योग्य मोबदला मिळण्यात अन्याय झाला. न्यायासाठी शासनाकडे त्यांनी वारंवार लेखी पत्रव्यवहार केला. शासनाकडे खेटे घातले. परंतु, त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून शेवटी नैैराश्यातून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यांच्या दालनात विष घेऊन त्यांनी आत्महत्या केली. महसूल खात्यातील भ्रष्ट कर्मचारी, अधिकारी अन् दलालांना हाताशी धरून खोटे पंचनामे कार्यालयात बसून करण्यात आले. तसेच त्यापोटी कोट्यवधी  रुपये जमिनीच्या मोबदल्यात हडप करण्याचा प्रकार इतर शेतकर्‍यांंनी केला. ही युक्ती मात्र, मयत धर्मा पाटलांना जमली नाही. त्यांच्या जमिनीचा खरा पंचनामा असला तरी त्यात अनेक प्रकारच्या त्रुटी दाखवून भ्रष्ट अधिकार्‍यांनी सह्याच केल्या नसल्याने योग्य मोबदल्यापासून ते वंचितच राहिले. आपल्या शेजारच्या शेतकर्‍यांची जमीन आपल्या एवढीच असताना त्याला एक कोटी 82 लाखांचा मोबदला मिळतो अन् आपल्या जमिनीला फक्त चार लाख रुपये मिळतात. याची खंत त्यांच्या मनात सलत होती. त्या नैराश्यातूनच हा आत्महत्येचा मार्ग पत्कारला आणि देश हादरून सोडला.

महाराष्ट्रातील विजेची टंचाई दूर करण्यासाठी 2007 सालामध्ये तत्कालीन शासनाने जाहीर केलेल्या प्रकल्पाचे गेल्या 11 वर्षांत तसूभरही काम झालेले नाही. धर्मा पाटलांची आत्महत्या झाली नसती तर हा सोलर प्रकल्प होणार असल्याची माहिती ही लोक विसरून गेले होते. महाराष्ट्रातील जनतेला हा प्रकल्प होतो आहे. याचा विसरही पडलेला होता. अशा पद्धतीने सरकारच्या वतीने होणार्‍या सार्वजनिक प्रकल्पांची वाट लागलेली आहे. त्यामुळे शासनावर दिरंगाईचे आरोप होतात. निधी कमी पडतो म्हणून शासन निधी वाढवून देते. त्यातून प्रकल्पाचे थातूरमातूर काम केले जाते. त्यानंतर निधी गायब होतो. भ्रष्टाचार झाला म्हणून आरोप होतात, हा भ्रष्टाचार सिद्ध होत नाही. कामामध्ये अनियमितता झाली असल्याचे सांगून भ्रष्टाचाराला बगल दिली जाते. या दुष्टचक्रात अनेक प्रकल्प अडकलेले आहेत. भाजपा शासनाकडून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. तथापि जे मागील सरकारने केले त्याच पावलावर भाजपाही पाऊल ठेवते आहे, अशी जनतेची भावना झाली आहे.

धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील सुडवाले, मेथी, प्रकाशा संचित प्रकल्प असेच रखडलेले आहेत. महामार्ग क्रमांक सहावरील धुळे जळगावातील फागणे ते तरसोद आणि तरसोद ते चिखलीपर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम असेच रेंगाळलेले आहे. जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरील पाडळसे धरण 20 वर्षांपासून पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत आहे. तेव्हापासूनच शेळगाव बॅरेज अर्धवट अवस्थेत पडून आहे. गिरणेवरील बलून बंधार्‍याची घोषणा हवेतच विरली आहे. मुक्ताईनगरातील कृषी महाविद्यालय होणार ही मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षांपूर्वी केलेली घोषणाच राहिली. बॅक वॉटरच्या पाण्यावर होणारे कोळीला 100 कोटीचे भव्य पर्यटन केंद्र गेले कुठे, वरणगावचे पोलीस प्रशिक्षण केंद्र उद्घाटनानंतर गायब झाले. भुसावळला होणारा प्लास्टिक पार्क, जामनेराला होणारा टेक्सटाइल्स पार्क अद्याप घोषणेतच आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक प्रकल्पासाठी आणि त्या मागणीसाठी किती धर्मा पाटील यांच्यासारख्या शेतकर्‍यांचा बळी द्यावा लागणार आहे.