होमपेज › Nashik › आमीरच्या ‘वॉटर कप’पासून सरकारी यंत्रणा अनभिज्ञ

आमीरच्या ‘वॉटर कप’पासून सरकारी यंत्रणा अनभिज्ञ

Published On: Apr 22 2018 1:13AM | Last Updated: Apr 21 2018 11:32PMनाशिक : प्रतिनिधी

अभिनेता आमीर खानच्या पानी फाउंडेशनमार्फत घेण्यात येणार्‍या वॉटर कप स्पर्धेसाठी चांदवड आणि सिन्‍नर या दोन तालुक्यांमधील गावांची निवड झाली खरी. पण, या सार्‍या प्रक्रियेपासून सरकारी यंत्रणा अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, स्पर्धेला पात्र होण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून अप्रत्यक्षरीत्या आर्थिक हातभार लागत असला तरी बोलबाला मात्र फाउंडेशनचाच होत आहे. 

फाउंडेशनने दोन वर्षांपासून हा उपक्रम हाती घेतला आहे. दुष्काळाशी दोन हात करून ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’, हा उद्देश त्यामागे आहे. ग्रामस्थांना महत्त्व कळावे म्हणून त्यांचाही यात सहभाग नोंदवून घेतला जात आहे. योजनेत सहभागी झालेल्या गावांना लाखो रुपयांचे बक्षीसही दिले जात आहे. फाउंडेशनचा उद्देश चांगला असला तरी उपक्रमासाठी गावांची निवड करताना लावले जाणारे निकष मात्र ना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला माहिती ना, जिल्हाधिकारी कार्यालयाला. विशेष म्हणजे, ज्या गावांची निवड फाउंडेशनमार्फतच केली जात आहे, ती योग्य पद्धतीने होते का विषयी साशंकता व्यक्‍त केली जात आहे.

नाशिक जिल्ह्यातील पेठ, चांदवड आणि सिन्‍नर तालुक्यातील गावांनी स्पर्धेत सहभागाची तयारी दर्शविली असताना चांदवड तालुक्यातील 50, तर सिन्‍नर तालुक्यातील 51 गावांची निवड झाली आहे. खरे तर, पेठ तालुक्यात पाऊस पडत असला तरी दुष्काळाचे सावट दरवर्षीच असते. येवला आणि सटाणा या तालुक्यांमध्ये मुळातच पावसाचे प्रमाण कमी असल्याने या भागात दरवर्षीच टँकरद्वारे पाण्याची तहान भागविली जाते. दुसरीकडे ज्या चांदवड तालुक्याला जलयुक्‍त शिवार योजनेचा पुरस्कार मिळाला आहे, तेथील गावांची निवड फाउंडेशनने केल्याने सरकारी अधिकारीही चक्रावले आहेत.

जलयुक्त शिवार योजनेचा पुरस्कार मिळाला म्हणजे चांदवडमध्ये  पाणी आडवा आणि पाणी जिरवा, यासाठी बंधारे, खोलीकरण, माती नाला बांध अशी कामे झाल्याचे स्पष्ट होते. शिवाय पुरस्कार मिळाला म्हणजे  या ठिकाणी पाण्याच्या बाबतीत समृद्धता प्राप्त झाली, असाच अर्थ निघतो. तरीही वर्षानुवर्षे तहानलेले तालुके वगळून चांदवड तालुक्याचा स्पर्धेसाठी विचार झाला, हे विशेष! दुसरीकडे जिल्ह्यातील गावांची वॉटर कपसाठी निवड झाली, यापासून जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषदेचा ग्रामीण पुरवठा विभागच अनभिज्ञ आहे. ना फाउंडेशनने या कार्यालयांना माहिती  दिली ना, अधिकार्‍यांनीही या फाउंडेशनविषयी जाणून घेण्यात रस दाखविला नाही.

स्पर्धेला पात्र होण्यासाठी गुण ठेवण्यात आले आहे. 40 टक्के कुटुंबांनी शोषखड्डे करणे आवश्यक असून, एकूण खातेदारांच्या 40 टक्के खातेदारांना सुधारित शोषखड्डे आदी निकषांसाठी गुण दिले जात आहे. या शोषखड्ड्यांसाठी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून संबंधिताने स्वत: श्रमदान केल्यास मजुरीपोटी 201 रुपये दिले जातात. म्हणजे, अप्रत्यक्षरीत्या वॉटर कप स्पर्धेला सरकारी यंत्रणेचा हातभार लागल्याचे स्पष्ट होते. तरीही आतापर्यंत सरकारी यंत्रणेचा कुठेही उल्लेख आढळून आला नाही. 

जिल्ह्यात महाराष्ट्रदिनी महाश्रमदान

मनसंधारणातून जलसंधारणाचे काम पानी फाउंडेशन करत असून, या उपक्रमाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद लाभत आहे. येत्या 1 मे रोजी महाराष्ट्रदिनी ‘सत्यमेव वॉटर कप’ स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांमध्ये जलमित्रच्या माध्यमातून महाश्रमदान घेण्यात येणार आहे. या उपक्रमात नाशिककरांनी सहभागी होत जलसंधारणाला हातभार लावावा, असे आवाहन पानी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी केले. 

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत उत्तर महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमधील आठ तालुक्यांचा समावेश असून, नाशिकमधील सिन्‍नर व चांदवड तालुके सहभागी आहेत. या तालुक्यांमध्ये सध्या लोकसहभागातून सुरू असलेल्या कामांची आणि महाश्रमदानाबाबत माहिती देण्यासाठी पानी फाउंडेशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (दि.21) पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आणि फाउंडेशनचे उत्तर महाराष्ट्रप्रमुख गणेश मांडेकर उपस्थित होते. 

राज्यातील गावांमध्ये श्रमदान करण्याची क्षमता आहे. मात्र, गावकर्‍यांना एकत्रित आणण्याची खरी गरज होती. हे काम गेल्या दोन वर्षांपासून फाउंडेशनने वॉटर कपच्या माध्यमातून केले आहे.यंदा स्पर्धेचे तिसरे वर्षे असल्याची माहिती भटकळ यांनी दिली. राज्यातील 24 जिल्ह्यांतील 75 तालुक्यांमधील चार हजार गावे यंदाच्या स्पर्धेत सहभागी झाली आहेत. या सर्व गावांमध्ये 8 एप्रिलपासून स्पर्धेचा प्रारंभ झाला आहे. स्पर्धेत सहभागी गावांमध्ये 1 मे रोजी महाश्रमदान घेण्यात येणार आहे. या श्रमदान शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भटकळ आणि त्यांच्या टीमने केले आहे. 

साठवण क्षमतेत वाढ                                                            

गावाच्या जमिनीवर गावकर्‍यांचाच पहिला हक्क आहे. ग्रामस्थ लोकसहभागातून मेहनत करत आहे. पानी फाउंडेशन हे फक्त निमित्त मात्र ठरत आहे. वॉटर कपमुळे अनेक गावांमधील भांडण-तंटे सुटले असून, लोक एकत्रित येऊन काम करत आहेत. पाणी अडविणे आणि पाणी जिरवण्याबरोबर पाण्याचे नियोजन तसेच गावांमधील पाणी साठवणुकीसाठीची संसाधने व कामाचा उत्कृष्टपणा अशा विविध गोष्टींवर स्पर्धेचे परीक्षण केले जाते. गेल्या दोन वर्षांत राज्यातील दीड हजार गावांनी या स्पर्धेत सहभागी होत श्रमदान केले. यामुळे राज्याच्या पाणी साठवणूक क्षमतेत 10 हजार कोटी लिटरने वाढ झाल्याचा दावा भटकळ यांनी केला. 

 

Tags : nashik, nashik news, Aamir Khan, water cups, government,