Wed, Jul 08, 2020 00:29होमपेज › Nashik › साडेचौदा हजार मतदारांची नोंदणी

साडेचौदा हजार मतदारांची नोंदणी

Published On: Dec 07 2017 1:32AM | Last Updated: Dec 06 2017 11:09PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विविध प्राधिकरण मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी विविध जागांसाठी एकूण 14 हजार 489 मतदार नोंदणी करण्यात आली आहे. विद्यापीठ अधिनियमानुसार अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळावरील विविध सदस्यांकरिता निवडणूक घेण्यात येत असल्याची माहिती कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

निवडणुकीबाबतची अंतिम मतदारयादी, नामनिर्देशन पत्राचा नमुना, उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच्या सूचना तसेच संदर्भीय दस्तऐवज आदी माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या अधिसभेसाठी राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती व नाशिक या महसूल विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण सहा प्राध्यापकांच्या जागांसाठी एकूण दोन हजार 258 मतदारांची नोंदणी झाली आहे. यात मुंबई विभागासाठी 563, पुणे विभागासाठी 609, औरंगाबाद विभागासाठी 341, नाशिक विभागासाठी 372, नागपूर विभागासाठी 227, अमरावती विभागासाठी 146 अशी मतदारांची नोंदणी झाली आहे. विद्यापीठाच्या अधिसभेसाठी वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि तत्सम विद्याशाखेतील एक याप्रमाणे पाच शिक्षकांकरिता निवडणूक घेण्यात येईल. यासाठी एकूण 9759 मतदार आहेत. वैद्यकीय विद्याशाखेसाठी 4131, दंत विद्याशाखेसाठी 1697, आयुर्वेद विद्याशाखेसाठी 1752 व युनानीसाठी 181 असे एकूण 1933, होमिओपॅथीसाठी 889 तर तत्सम विद्याशाखांसाठी 1109 मतदारांची नोंद झाली आहे.

विद्यापीठाच्या विद्या परिषदेसाठी वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि तत्सम विद्या शाखेतील प्रत्येकी एक याप्रमाणे पाच प्राचार्यांची विद्या शाखानिहाय निवडणूक घेण्यात येईल. यामध्ये वैद्यकीय विद्या शाखा महिला तर दंत विद्या शाखा अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता सोडतीद्वारे आरक्षित आहे. यासाठी एकूण 200 मतदार आहेत. वैद्यकीय विद्या शाखेसाठी 36, दंत विद्याशाखेसाठी 25, आयुर्वेद व युनानीसाठी 46, होमिओपॅथीसाठी 40 तर तत्सम विद्या शाखांसाठी 52 मतदारांची नोंद झाली आहे. विद्यापीठाच्या अभ्यास मंडळासाठी प्रत्येक विद्याखेतील पदवी व पदव्युत्तर अभ्यास मंडळाचे एकत्रित सहा विभागप्रमुख असतील यामध्ये एकूण 18 विविध अभ्यास मंडळांकरिता सदस्यांची निवडणूक घेण्यात येईल. यात आधुनिक वैद्यक विद्या शाखेमध्ये 685, दंत विद्या शाखेमध्ये 231, आयुर्वेद विद्या शाखेमध्ये 665, युनानी विद्या शाखेसाठी 673, होमिओपॅथी विद्या शाखेसाठी 508, नर्सिंगसाठी 67, ऑक्युपेशनल थेरपीसाठी 42, फिजिओथेरपीसाठी 37 असे एकूण 2272 मतदार नोंदविले गेले आहेत.