Mon, Jun 24, 2019 21:11होमपेज › Nashik › वीरांच्या दर्शनासाठी झुंबड

वीरांच्या दर्शनासाठी झुंबड

Published On: Mar 03 2018 2:06AM | Last Updated: Mar 03 2018 2:02AMद्वारका : वार्ताहर

पूर्वजांची आठवण म्हणून देवघरातील असलेल्या ‘टाक’ला मिरवण्याची प्रथा असल्याने होळीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच धूलिवंदनाच्या दिवशी शुक्रवारी (दि.2) देवघरातील टाक हे घराघरातून वाजत गाजत मिरवण्यात आले. यावेळी घरातील लहान मुलांना विविध देवदेवतांची वेशभूषा करून हे वीर जुन्या नाशिकमधून रामकुंडापर्यंत मिरवण्यात आले. 

मानाचा वीर म्हणून संबोधला जाणारा दाजीबा वीर म्हणजेच बाशिंगी वीराला नेहमीप्रमाणे सन्मान देण्यात आला. नवसाला पावणारा हा वीर असल्याने या वीरांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. वीरांची मिरवणूक ही जुन्या नाशकातील बेलगावकर वाडा येथून वाजतगाजत दुपारी 2 वाजता मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. बुधवार पेठ, मधली होळी, गुलालवाडी, मेनरोड, रविवार कारंजा मार्गे रामकुंडा पर्यंत काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भाविकांनी सहभाग नोंदवला.

गेल्या 105 वर्षापासून हा मानाचा वीर निघत आहे. यावर्षीचा दाजीबा वीराचा मान हा विनोद हिरामण बेलगावकर यांना मिळाला. 105 वर्षापूर्वी सदाशिव भागवत यांच्या पहिल्या पिढीतील त्यांचा मुलगा नारायण भागवत यांच्या तीन पिढ्यांना या मिरवणुकीचा मान मिळाला. तसेच, गेल्या 22 वर्षापासून चार  पिढ्यांचा मान बेलगावकर कुटुंबीयांचा असल्याची माहिती हिरामण बेलगावकर यांनी दिली.
दाजीबा वीराचा पोशाख 

फेटा, त्यावर खंडेराव महाराजाचा मुखवटा, मुंडावळी,  सोन्याच्या बाळ्या, गळ्यात सरी,  सोन्याचे कडे, धोतर अशा पेहरावात दाजीबा वीर वाजतगाजत मिरवणूकीत सहभागी झाले. दाजीबा वीराप्रमाणे विविध देवदेवतांच्या वेशभूषेत लहान मोठी मंडळीही वीर बनून वीराला नाचवत होते.