Fri, Jul 19, 2019 13:32होमपेज › Nashik › शिक्षकासाठी रडले गाव!

शिक्षकासाठी रडले गाव!

Published On: Jun 26 2018 1:15AM | Last Updated: Jun 25 2018 10:52PMइगतपुरी : वार्ताहर

समाजाशी शिक्षकांची नाळ तुटत असलेली पाहायला मिळते. परंतु, यातून गाव व शिक्षकांमध्ये एक प्रकारचा दुरावा निर्माण झालेला दिसतो. जिल्हा परिषद शाळांच्या घसरत्या गुणवत्तेवरून शिक्षक कायमच समाजाचे लक्ष्य होताना दिसतात. मात्र, समाजासाठी आपण प्रामाणिक भावनेने काम केले तर समाज त्याची अविस्मरणीय परतफेड करतोय हे पाहायला मिळाले इगतपुरी तालुक्यातील पांगुळगव्हाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत.

यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या नवीन बदली धोरणाने शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या. त्यातच या गावात अकरा वर्षांपासून उत्कृष्ट शैक्षणिक व सामाजिक कार्य करणारे शिक्षक वैभव धर्मराज गगे यांची बदली झाली आणि गावावर जणू काही शोककळा पसरली. गेली पंधरा दिवस गावकर्‍यांच्या मुखी एकच विषय होता तो म्हणजे आपल्या सरांची बदली झाली.

ऑनलाइन बदल्यांची अपरिहार्यता लक्षात घेता गावकर्‍यांनी हा निर्णय नाईलाजाने स्वीकारला व आपल्या लाडक्या शिक्षकाला असा काही निरोप दिला की तो शैक्षणिक क्षेत्रात प्रत्येकाला प्रेरणा देऊन गेला. निरोपप्रसंगी शिक्षकांचा यथोचित सत्कार करताना प्रत्येक गावकर्‍याच्या डोळ्यात अश्रू होते. विद्यार्थ्यांना हुंदका आवरणे अशक्य होते. वैभव गगे सरांच्या कार्याबद्दल माहिती देताना प्रत्येकाचा कंठ दाटून येत होता. इगतपुरी तालुक्यात मुंबईतील विविध संस्थांच्या मदतीने तालुक्यातील बावीस शाळांचे डिजिटलायजेशन व तीन गावांत महिलांसाठी पाणीपुरवठ्याची सोय गगे सरांनी करून दिली आहे. असा शिक्षक गावाच्या शाळेवरून जाणे ही गावची खूप मोठी हानी असल्याची भावना प्रत्येक नागरिक व्यक्‍त करीत होते. ‘तुम्ही सर्वांनी जे प्रेम दिले त्यामुळे या जन्माचं सार्थक झालं’ अशी भावना गगे सरांनी यावेळी व्यक्‍त केली.