Sun, Jul 05, 2020 22:58होमपेज › Nashik › आरोग्य केंद्रासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाका

आरोग्य केंद्रासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाका

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

वावी : वार्ताहर

पाण्याअभावी प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या रुग्णावर शस्त्रक्रिया करणे अवघड होते. अनेकदा शस्त्रक्रियाच रद्द कराव्या लागतात. त्यामुळे परिसरातील रुग्णांची मोठी हेळसांड होते. त्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य केंद्रासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याची सूचना जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार यांनी दिली. 

सिन्नर तालुक्यातील वावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, सरपंच मंगल वेलजाळी,  ग्रा.पं. सदस्य किरण घेगडमल, अलका पठाडे, बेबी आनप, नंदलाल मालपाणी, आशिष माळवे, दीपक वेलजाळी, सोमनाथ संधान, चंद्रकांत पठाडे,  वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद वाडिले, डॉ. कोठावदे, ग्रामविकास अधिकारी निकम आदी उपस्थित होते.  

मार्च 2018 अखेर आरोग्य केंद्राला उपलब्ध पावणेदोन लाखांच्या अनुदानातून अत्यावश्यक बाबींवर प्राधान्याने खर्च करण्यात यावा, असे बैठकीत ठरवण्यात आले. प्रसूतिपूर्व तपासणीसाठी गर्भातील बाळाचे ठोके मोजण्यासाठी डॉपलर मशीन खरेदीसह कुटुंब कल्याण शस्रक्रिया करण्यासाठी बाहेरून औषधे खरेदी करण्यास मंजुरी, औषध विभागात संगणक, पायर्‍यांसाठी संरक्षक कठडे बसविण्यास मंजुरी व वीज बिलासाठी जि.प. स्तरावरून तरतूद करण्याचा ठराव मांडण्यात आला. 14 व्या वित्त आयोग निधीतून आरोग्य उपकेंद्रासाठी शौचालय उभारणी करण्यात येत असल्याचे ग्रामविकास अधिकारी निकम यांनी सांगितले. ग्रामविकास मंडळाच्यावतीने शिबिरास सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्‍वासन आशिष माळवे यांनी दिले.