Mon, Jun 24, 2019 21:51होमपेज › Nashik › एम एच १५ कडून टोल घेतल्यास टोल नाका फोडू : शिवसेना  

एम एच १५ कडून टोल घेतल्यास टोल नाका फोडू : शिवसेना  

Published On: Apr 10 2018 3:55PM | Last Updated: Apr 10 2018 3:55PM उपनगर वार्ताहर

अनेक दिवसांपासून नाशिक पुणे रोड वरील शिंदे गावाजवळील टोल नाक्यावर स्थानिक वाहनांना टोल मुक्ती मिळावी यासाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व सामान्य शिवसैनिकांसह आ राजाभाऊ वाजे,योगेश घोलप ,खा हेमंत गोडसे,जिल्हा प्रमुख विजय करंजकर,सचिन मराठे,जगन आगळे यांच्यासह शिवसैनिकांनी व स्थानिक नागरिकांनी केले.
२५.३ किलोमीटर च्या या रसत्‍याचे अनेक दिवसांपासून काम चालू आहे. आजही साधारण तीन किलोमीटर रस्ता खराब असून या रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या स्थानिक गाड्यांवर टोल लावला जातो. एम एच १५ या नाशिक च्या गाड्यांवर टोल वसुली करू नये यासाठी शिवसेनेने आंदोलन केले. या आंदोलनात देवळाली आणि नाशिक रोड मधील हजारो शिवसैनिक उपस्थित झाले होते, सकाळी १०.३० पासून सबंध नाशिक पुणे रोड हाउसफुल्‍ल झाला होता. या वेळी शिवसैनिकांनी टोल नाक्याच्या काचा फोडून रोष व्यक्त केला. तीन तास चाललेल्या या आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली होती. या वेळी आंदोलकांशी सिन्नर नाशिक टोल वेज चे प्रकल्प संचालक सुनील भोसले ,सरकारच्या राष्ट्रीय महामार्गाचे डेप्‍युटी अभियंता सी आर सोनवणे यांनी चर्चा केली. या चर्चे दरम्यान अतिशय तणाव निर्माण झाला होता. अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून  निर्णय घेतला जाईल असे या अधिकार्‍यांनी सांगितले. खा हेमंत गोडसे,आ योगेश घोलप,नगरसेवक केशव पोरजे यांनी कंपनीच्या अधिकार्‍यांना आठ दिवस मुदत दिलेली आहे. या आठ दिवसात  एम एच १५ क्रमांक असणारी वाहने मोफत सोडली जातील असे कंपनीच्या अधिकार्‍यांना जाहीर करायला शिवसैनिकांनी भाग पाडले. या वेळी कंपनीचे प्रकल्प संचालक सुनील भोसले यांनी आठ दिवसात आम्ही पुढील कार्यवाही जाहीर करून आठ दिवस सर्व प्रकारची व्यावसायिक वाहने वगळता  एम एच १५ या गाड्या कडून कुठलाही टोल घेणार नाही असे जाहीर केले . आ योगेश घोलप यांनी टोल घेतल्यास कोणालाही कल्पना न देता टोल नाका बंद करू असे मत व्यक्त केले. खा हेमंत गोडसे यांच्या विनंती वरून शिवसैनिकांनी आंदोलनाचा समारोप केला. सुदाम देम्से,सुर्यकांत लवटे,सुनील देवकर,बंटी तिदमे ,शिवा ताकाटे,महेश बडवे या वेळी शिवसैनिकांसह उपस्थित होते. आंदोलनाला पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण,ए सी पी सचिन गोऱ्हे,नाशिक रोड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे,कॅम्प पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुभाष डवले,रूपेश काळे,विजय पवार,सुजित मुंढे,प्रदीप वाकचौरे ,दिनेश मुळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. साधारण शंभर पोलीस कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते.

अशी आहे टोल ची परिस्थिती 

२५.३ किलोमीटर चा फुल बांधण्यात आलेला असून त्यापैकी २.३ किलोमिटर दारणा नदी ते नाशिक रोड रस्ता न्यायालयीन दाव्यात अडकला आहे. हा रस्ता बांधण्यासाठी नाशिक सिन्नर टोल वेज या कंपनीने ८० कोटी,विविध बँकांनी कर्जाच्या स्वरूपात १९० कोटी दिलेले असून सरकारने १२० कोटी रुपये खर्च केले आहेत. शासनाचा कंपनीशी करार हा सोळा वर्षाचा असून स्थानिक गावच्या रहिवाशांना हा टोल मोफत केलेला आहे.

तीन  तास वाहतूक खोळंबा

टोल चे आंदोलन चालू असताना तीन तास वाहतुकीला खोळंबा झाला होता. सिन्नर कडून येणारी वाहतूक घाटातून जामगाव मार्गे वळवण्यात आली. तसेच नाशिक वरून येणारी वाहतूक पळसे कारखान्याकडून वळवण्यात आली होती.संगमनेर पुणे येथे जाणार्‍या वाहनांनी रस्त्यातच थांबणे पसंत केले.

स्थानिकाना टोल माफ झाल्यास करार वाढणार 

राष्ट्रीय महामार्गाचे सरकारी अभियंता सी आर सोनावणे  यांनी सांगितले आहे कि स्थानिकांना टोल माफ केल्यास करार वाढवायचा विचार केला जाईल. सध्या स्थानिकांना टोल माफ करून कंपनी आणि शासनाचे किती नुकसान होते हे पाहून करार वाढवायचा विचार शासकीय दरबारी ठेवला जाईल. कंपनीचे किती नुकसान होणार हे सर्वे च्या माध्यमातून पहिले जाणार असून, आंदोलनकर्त्यांची मागणी शासकीय स्थरावर पोहोचवली जाईल. टोल  वसूल करण्याची नियमावली  शासन ठरवून देत असते.त्यामुळे नियमानुसार टोल वसूल करीत असून आंदोलकांची भावना शासकीय यंत्रणेला कळवली जाईल.
शिवसेनेने आठ दिवसांचा अल्‍टीमेटम दिलेला असून या नंतर स्थानिक वाहनांना टोल वसूल झाल्यास टोल नाका फोडून टाकला जाईल. टोल मुळे स्थानिकांच्या खिशाला हा भुर्दंड सोसावा लागत असून, एम एच १५ गाड्या असणार्‍या वाहनचालकांनी टोल भरू नये’’ : आ योगेश घोलप

‘’ आंदोलकांची मागणी आम्ही शासकीय दरबारी पोहोचवणार असून करार झाल्यानुसार आजपर्यंत आम्ही कारवाई करीत आहे. टोल किती असावा यावर शासनाने जी आर काढला आहे.आठ दिवसानंतर पुढील कार्यवाही घोषित करण्यात येईल .तो पर्यंत व्यवसायिक वाहने वगळता एम एच १५ ला टोल माफ केला जाईल.’’- सुनील भोसले (प्रकल्प संचालक)