Tue, Mar 19, 2019 11:31होमपेज › Nashik › तोतया भरारी पथक आले, शेरा मारून गेले!

तोतया भरारी पथक आले, शेरा मारून गेले!

Published On: Mar 01 2018 11:03PM | Last Updated: Mar 01 2018 10:55PMउपनगर : वार्ताहर

जेलरोड येथील अभिनव मराठी शाळेत इयत्ता दहावीच्या पहिल्या पेपरच्या दिवशी तोतया भरारी पथकाने विद्यार्थ्यांची झाडाझडती घेतली. तसेच, शाळेच्या रजिस्टरमध्ये कॉपीमुक्त परीक्षा केंद्र असा शेरा देखील मारला. मात्र, काही नागरिकांच्या हे लक्षात आल्याने तोतया भरारी पथकाची पोलखोल झाली. या प्रकरणी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्या आदेशानंतर शाळेने तोतया भरारी पथकाविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पथकातील दोघा भामट्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

पेपर सुरू होण्यास काही कालवधी बाकी असताना दोन युवक शाळेत आले. त्यांनी मुख्याध्यापिका ऊर्मिला भालके व केंद्र संचालिका जयश्री ठाकरे     भेट घेऊन आपण बोर्डाच्या भरारी पथकाचे सदस्य असल्याचा दावा केला. बोर्डाची झेराक्स कागदपत्रे तसेच खोटे ओळखपत्र दाखवले. खात्रीसाठी भ्रमणध्वनी क्रमांकही दिला.  या दोघांनी कॉपीमुक्त अभियानासाठी आपण शाळेत आल्याचे सांगून शिक्षकांशीही बोलायचे असल्याचे सांगितले. मात्र, शिक्षकांना येण्यास वेळ होता. त्यामुळे हे दोघे बाहेर येऊन विद्यार्थ्यांची तपासणी करू लागले. निवृत्त उपजिल्हाधिकारी पवार हे दहावीच्या परीक्षेसाठी नातवाला घेऊन आले होते. त्यांना दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव व एसएससी बोर्डाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून या प्रकाराची त्यांना माहिती दिली. यावेळी अधिकार्‍यांनी शाळेत पथक पाठवले नसल्याची माहिती दिली. तोपर्यंत तोतया पथकाने शाळेतून काढता पाय घेतला. त्यानंतर शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव आणि बोर्डाचे अधिकारी एम. व्ही. कदम तातडीने शाळेत आले. त्यांनी या  प्रकाराची शाळेतील शिक्षकांकडून माहिती घेतली. शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी केंद्रसंचालकांना उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याच्या सूचना दिल्या. जाधव यांनी अन्य शाळांना सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे. दरम्यान या युवकांचा शाळेत येण्याचा उदेश काय होता हे मात्र, समजू शकले नाही.