Tue, Nov 13, 2018 04:16होमपेज › Nashik › माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांचे निधन

माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांचे निधन

Published On: Aug 18 2018 1:02AM | Last Updated: Aug 18 2018 12:17AMउपनगर : वार्ताहर 

शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्रातील पहिले खासदार राजाभाऊ परशराम गोडसे (57) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. शुक्रवारी (दि. 17) सायंकाळी 5 वाजता त्यांनी नाशिक येथील खासगी रुग्णालयात अखेरचा श्‍वास घेतला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुली, नातवंडे असा परिवार आहे. गोडसे यांच्या पार्थिवावर शनिवारी (दि.18) सकाळी 11 वाजता संसरी या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

राजाभाऊ गोडसे हे सन 1996 ते 1998 दरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार होते. त्यापूर्वी 10 वर्षे त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहिले. 80 च्या दशकात शिवसेनेचे पहिले सरपंच म्हणून निवडून येण्याचा मान त्यांनी मिळविला होता. पंचायत समिती सदस्य म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. जिल्हाप्रमुखपदाच्या कारकीर्दीत त्यांनी जिल्ह्यात शिवसेनेच्या 1,300 शाखा उघडल्या होत्या. शिवसेनेत असताना छगन भुजबळ आणि गोडसे यांनी एकत्र कामे केली होती. सन 1995 मध्ये शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्रातील चौथे अधिवेशन नाशिक येथे झाल्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी ‘दार उघड बये दार उघड’ अशी साद नाशिककरांना घातली होती. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत 1996 मध्ये येथील जनतेने त्यांना खासदार म्हणून निवडून दिले होते. बाळासाहेब ठाकरे यांनीही त्यांचा उल्लेख ‘नाशिकचा वाघ’ असा केला होता. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. अखेर शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली.