Thu, Aug 22, 2019 12:29होमपेज › Nashik › शिवजन्मोत्सवाची नवलाई

शिवजन्मोत्सवाची नवलाई

Published On: Feb 20 2018 1:17AM | Last Updated: Feb 20 2018 1:17AMनाशिक : प्रतिनिधी

‘राजे पुन्हा जन्माला या, जय भवानी, जय शिवाजी, संभा की जय बोलो, शिवा की जय बोलो’, असा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात सोमवारी (दि.19) सायंकाळी शहरात निघालेल्या मिरवणुकीतील आकर्षक चित्ररथांनी नाशिककरांचे लक्ष वेधले. सकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर शिवजन्मोत्सव साजरा झाला, तर जिल्ह्यात शिवजयंतीचा अभूतपूर्व उत्साह दिसून आला.  

शहरात वाकडी बारव येथून निघालेल्या मिरवणुकीत आठ मंडळे सहभागी झाली होती. या मिरवणुकीत यंदा छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या भगिनी मनीषा पाटील, नाशिकचे रत्नशील राजे, सोनाली पवार, महापौर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, नगरसेवक वत्सला खैरे, माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, मीर मुक्तार अशरफी, भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी आदींसह विविध मंडळांचे पदाधिकारी व शवभक्त सहभागी झाले होते. मान्यवरांच्या हस्ते पालखीतील शिवपुतळ्यास पुष्पहार व श्रीफळ वाढवून मिरवणुकीस प्रारंभ झाला. प्रथम क्रमांकाच्या मिरवणुकीचा  मान भद्रकाली येथील छत्रपती सेनेला मिळाला. 120 युवक-युवतींचा सहभाग असलेले ढोल पथक लक्षवेधी ठरले. तसेच, शिवाजी महाराजांचा पेहराव परिधान करून सहभागी झालेली लहान बालके आणि मावळ्यांच्या वेशभूषेतील कलाकार मिरवणुकीतील आकर्षण ठरले.

 शहरातील 8 सार्वजनिक मंडळांनी डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असलेल्या चित्ररथांची यंदा मिरवणूक काढली. वाकडी बारव, दूध बाजार, भद्रकाली, विजयानंद चित्रपटगृह, गाडगे महाराज  पुतळा, मेनरोड, एमजी रोड, मेहेर सिग्नलमार्गे जिल्हा न्यायालयासमोरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मिरवणुकीचा समारोप झाला. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवप्रेमींनी मिरवणूक पाहण्यास गर्दी केली होती. रात्री उशिरा मिरवणुकीचा समारोप झाला.