होमपेज › Nashik › ऑफिसबॉय, चालक बनून धनादेश चोरणारा गजाआड

ऑफिसबॉय, चालक बनून धनादेश चोरणारा गजाआड

Published On: Aug 24 2018 12:46AM | Last Updated: Aug 23 2018 11:18PMनाशिक : प्रतिनिधी

वर्तमानपत्रात नोकरीच्या जाहिराती बघून ऑफिसबॉय किंवा चालक म्हणून नोकरी करण्याचा बहाणा करीत धनादेश चोरून बनावट स्वाक्षरी करून बँकेतून परस्पर पैसे काढणार्‍या संशयित भामट्यास भद्रकाली पोलिसांनी अटक केली आहे. रतेश विश्राम कर्डक असे या संशयिताचे नाव आहे. त्याने याप्रकारे अनेकांना गंडवल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. 

संजीव रघुनाथ नवाल यांच्याकडे कामास असलेल्या धीरज मदनराव मत्सागर नावाच्या युवकाने धनादेश चोरून त्यावर नवाल यांची बनावट स्वाक्षरी करीत बँकेतून 60 हजार रुपये परस्पर काढले होते. ही बाब लक्षात आल्यानंतर नवाल यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात फिर्याद दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांनी या प्रकरणी चौकशी केली असता याचप्रकारे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता संशयित ठाणे येथील नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे समजले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेत चौकशी केली असता त्याचे खरे नाव रतेश विश्राम कर्डक (32, रा. पेठरोड) असल्याचे समजले. 

वर्तमानपत्रातील जाहिरात बघून बांधकाम व्यावसायिकांकडे ऑफिसबॉय किंवा चालक म्हणून नोकरी करीत मालकांचा विश्‍वास संपादन करत होता. त्यानंतर संधी मिळताच धनादेश चोरी करून त्यावर मालकाची बनावट स्वाक्षरी करून धनादेश वटवून पैसे काढत असल्याची कबुली दिली. ही कामगिरी सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विशाल गिरी, पोलीस शिपाई प्रमोद गायकवाड, युवराज सहाणे यांनी केली.