Tue, Apr 23, 2019 14:23होमपेज › Nashik › इतकेच मला जाताना सरणावर कळले होते...

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते...

Published On: Aug 02 2018 2:00AM | Last Updated: Aug 01 2018 11:02PMनाशिक : गौरव अहिरे

‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते,
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते..’

- कविवर्य सुरेश भट यांनी या गझलेतून जगण्याने छळल्याची व्यथा मांडली असली, तरी यातनांनी मरणानंतरही कित्येकांचा पिच्छा सोडला नसल्याचे वास्तवही अनेकदा समोर येते. याचा जिल्हा रुग्णालयात अनेक वर्षांपासून वारंवार प्रत्यय येत आहे. गेल्या सहा वर्षांत तब्बल 1 हजार 649 व्यक्‍तींना ‘बेवारस’ म्हणूनच जगाचा निरोप घ्यावा लागल्याची धक्‍कादायक बाब समोर आली आहे, तर अवघ्या तिघा मयतांवरच नातलगांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार होऊ शकले आहेत. 

जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवागारात सन 2013 ते जुलै 2018 या कालावधीत 1 हजार 652 बेवारस मृतदेह त्यांच्या नातलगांच्या प्रतीक्षेत होते. मात्र, त्यांचे नातलग वा मित्रपरिवारातील कोणीही न आल्याने मनपा प्रशासनातर्फे त्यांचा बेवारस म्हणून अंत्यविधी करण्यात आला. त्याबरोबरच तो मृतदेह कोणाचा होता, हा प्रश्‍नही चिरंतन राहिला आहे. शहरीकरणाच्या वेगात माणुसकी नावालाच शिल्लक असल्याचे चित्र अनेकदा अनुभवण्यास मिळते. आजारपण, दुखापत किंवा घात-अपघातामुळे जखमी झालेल्या व्यक्‍ती सभोवताली अनेकदा दिसतात. मात्र स्पर्धेच्या दुनियेत टिकण्याच्या धडपडीत बहुतांश वेळा सर्वसामान्य नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यानंतर या जखमी किंवा मृत व्यक्‍ती जिल्हा रुग्णालयात बेवारस म्हणून दाखल होतात. उपचारांमुळे बर्‍या झाल्यास त्यांची ओळख पटवणे सोपे जाते. मात्र, उपचारादरम्यान किंवा त्याआधीच मृत्यू झालेल्या व्यक्‍तींची ओळख पटविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असते. त्यासाठी पोलीस यंत्रणा झटत असते. मात्र दरवेळी त्यांना यश मिळतेच, असे नाही. 

जिल्हा रुग्णालयातील शवागारात बेवारस म्हणून 7 दिवसांपर्यंत मृतदेह सांभाळला जातो. पोलिसांचा अहवाल आल्यानंतर या मृतदेहांवर मनपा प्रशासनातर्फे  अंत्यविधी केला जातो. त्याआधी बेवारस मृतदेहाचे छायाचित्र, त्या व्यक्‍तीकडे सापडलेल्या वस्तू, अंगावरील व्रण तसेच खुणा छायाचित्राद्वारे जतन केल्या जातात. यामुळे भविष्यात एखाद्यान व्यक्‍तीने सांगितलेले वर्णन त्या मृतदेहाशी जुळल्यास त्याची ओळख पटवणे शक्य होते. गेल्या सहा वर्षांत 1 हजार 652 पैकी अवघ्या तीनच मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आले आहे. त्यामुळे अन्य व्यक्‍तींची ओळख, आयुष्य, कार्य, कर्तृत्व त्यांच्या अंत्यसंस्कारांनंतर काळाच्या पडद्याआड गेले आहे. सुरेश भट यांच्या गझलेतील - ‘ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही,मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते..’या ओळींचाही विषण्ण करणारा प्रत्ययदेखील त्यातून येऊन गेला आहे. 

कुंभमेळ्यानंतर सर्वाधिक मृतदेह : जिल्ह्यात सर्वाधिक बेवारस मृतदेह 50 वर्षांपुढील वयोगटातील व्यक्‍तींचे सापडले आहेत. त्यांपैकी अनेकांचा मृत्यू आजारपणामुळे झाला आहे. सिंहस्थ कालावधीत देशभरातील भाविकांच्या गर्दीत काही पाषाणहृदयी लोकांनी त्यांच्या वृद्ध आई-वडिलांना पंचवटी परिसरात बेवारस म्हणून सोडून दिले होते. वृद्धांनी त्यांच्या मुला-बाळांचा शोध घेण्याच्या प्रयत्नातच या जगाचा निरोप घेतला. अशा मृतदेहांच्या नातलगांचा शोध घेणे अवघड झाल्याने त्यांचीही ङ्गबेवारसफ म्हणून नोंद करण्यात आली. त्यामुळे पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सर्वाधिक बेवारस मृतदेह सापडल्याचे चित्र आहे. 

घात-अपघातही कारणीभूत : बेवारस मृतदेहांपैकी 1 ते 2 टक्के मृतदेह घातपातातील  होते. रस्ता अपघातामुळे बेघरांचा मृत्यू झाल्यास त्यांची ओळख पटविणे अवघड जाते. तर कधी कधी एखाद्याचा खून करून ओळख पटणार नाही अशा रीतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली जाते. सिन्नर येथे एका तरुणीचा खून करून तिचे हात-पाय आणि शीर वेगळे करून फक्‍त धड फेकण्यात आले होते. त्या मृतदेहाची ओळख पटविण्यात अखेरपर्यंत यश आले नाही. 

बेघर-फिरस्त्यांचा प्रश्‍न गंभीर : जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेघर-फिरस्ते लोक असतात. ते स्वत:ची ओळख लपवून ठेवतात किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याने समाजात असूनही दुर्लक्षित राहतात. कालांतराने त्यांचा मृत्यू झाल्यास त्यांची ओळख पटविण्यासाठीही प्रयत्न होत नाहीत. अशा बेघर-फिरस्त्यांची माहिती संकलित करण्याची गरज आहे.