Tue, May 30, 2017 04:08
29°C
  Breaking News  


होमपेज › Nashik › उद्धव ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका

सत्तेला लाथ मारायला विलंब लागणार नाही 

By pudhari | Publish Date: May 19 2017 5:43PM


नाशिक : 
रावसाहेब दानवे यांचे विधान ऐकून तळ पायाची आग मस्तकात गेली, आता शेतकरी शांत बसणार नाही, साले म्हणाऱ्यांची साले काढतील. सरकारने तूर घोटळा केला, तुरीचे बम्पर पीक येणार माहित असतांना तूर आयात केली. असे होत असेल तर, सत्तेला लाथ मारायला मला एका क्षणाचाही विलंब लागणार नाही. असे वक्‍तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. 


नाशिक येथे आयोजीत करण्यात आलेल्‍या शेतकरी मेळाव्यात बोलताना उध्दव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी केल्यास सरकार पडू देणार नाही. कर्जमाफी द्या, आम्ही बाहेरुन विनाशर्त पाठिंबा देतो असे जाहीर आवाहन केले. 


खूप झाली मन कि बात, आता शेतकरी बोलतील, विदेशातून काळा पैसे आणून देणार होते त्याचे काय झाले, ते आणून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा असे म्‍हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. 


यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी समृद्धी महामार्गाला तीव्र विरोध केला, समृद्ध मार्गासाठी शेतकऱ्यांच्या समृद्धीवर वरवंटा फिरवू नका. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करुन समृद्धी महामार्ग करण्याची काही गरज नसल्‍याचे उध्दव ठाकरे म्‍हणाले. 


महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये फूट पाडणारे आम्ही कपाळकरंटे नाही. कर्जमाफी तात्पुरता इलाज असेल, पण तात्पुरता तरी इलाज करा, पुढचे पुढे बघू अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.