Wed, Jun 26, 2019 11:24होमपेज › Nashik › बागलाणमध्ये दोघांचा बुडून मृत्यू

बागलाणमध्ये दोघांचा बुडून मृत्यू

Published On: Mar 09 2018 1:35AM | Last Updated: Mar 08 2018 11:16PMवीरगाव : 

पाझर तलावात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी ( दि. 8) वटार (ता. बागलाण) येेथे घडली. कविता सुरेश सोनवणे (14) व दत्तू छोटू पवार (12) अशी मृतांची नावे आहेत. वटार येथील आदिवासी वस्तीतील कविता सोनवणे व दत्तू पवार हे शेळ्या चारण्यासाठी विंचूर शिवारातील पाझर तलाव परिसरात गेले होते. दुपारी 2.30 च्या सुमारास शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी दोघेही या पाझर तलावावर आले असता दत्तूचा पाय घसरून तो तलावात पडला. हा तलाव आरक्षित पाण्याने नुकताच भरला गेल्याने तलावात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने दत्तू त्यात बुडू लागला. हे पाहून कविताने हात देऊन दत्तूला वाचविण्याचा प्रयत्न केला.

मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तीही दत्तूबरोबर बुडू लागली. यावेळी त्यांनी आरडाओरड करून मदत मागितली. मात्र, घटनास्थळी नागरिक येईपर्यंत दोघांचाही बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले.

खिराड धरणात तीन जण बुडाले

सुरगाणाः वार्ताहर

तालुक्यातील घागबारीत सोमवारी (दि.5 )  दुपारी अडीच ते तीन वाजेच्या  दरम्यानखिराड धरणात तीन जण बुडाले. यात आजी आणि दोन नातवांचा समावेश आहे. येथील गायकवाड  कुटुंबावर ही दूर्घटना ओढावली.याबाबत घागबारी येथील  सामाजिक कार्यकर्ते तुळशीदास पिठे यांच्या  कडून समजलेली अधिक माहिती अशी की, जिल्हा परिषद शाळेत पाचवीत शिकणारे  योगेश रामचंद्र  गायकवाड  वय (11), मोनिका  रामचंद्र गायकवाड    (9) , युवराज गावित, हे सोमवारी  सकाळची शाळा असल्याने शाळेत आले होते. मात्र शाळा सुटल्यावर दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास आजी मांगीबाई लक्ष्मण  गायकवाड वय (53) यांचे सोबत ,जवळच असलेल्या कळवण तालुक्यातील खिराडच्या  धरणावर गोधडी पांघरून,  कपडे धुवायला गेले होते . आजी गोधड्या  धुण्यात मग्न असतांना  दोन्ही भावंडे पाण्यात डुबक्या मारुन  खेळत होते.

तेवढ्यात मोनिकाचा पाय घसरल्याने ती खोल पाण्यात  बुडायला लागली हे भाऊ योगेशच्या लक्षात येताच बहिणीला वाचवायला तोही खोल पाण्यात गेला. बहीण घाबरुन गेल्याने तिने भावाला घट्ट मिठी मारली त्याच वेळी हे दोन्ही भावंडे पाण्यात  बुडाले.  हे पाहताच आजी मांगीबाई  हिने दोघांना  वाचविण्याकरीता पाण्यात  उडी घेतली . दोघेही  भावंडांच्या नाकातोंडात  पाणी गेल्याने घाबरलेल्या  अवस्थेत त्यांनी आजीला घट्ट मिठी मारून आवळून  धरल्याने आजीही पाण्यात  बुडू लागल्या. त्याच दरम्यान आजीचा नातू (मुलीचा मुलगा) युवराज गावित  वय 6  वर्षे याने  ही सर्व घटना पाहिल्यावर आरडाओरडा  करण्यास सुरुवात केली. आजुबाजुला असलेले शेतात  काम करणारे गावकरी  मदतीला धावून आले . मात्र बराच उशीर झाल्याने  या  तिघांचा तोपर्यंत खिराडच्या  धरणात  बुडून दुर्दैवी  अंत झाला होता.

 ही घटना पोलीस  निरीक्षक  लिलाधर कानडे यांना भ्रमणध्वनीद्वारे  कळविण्यात आली होती.  मात्र, धरण हे कळवणच्या हद्दीत  येत असल्याने  तेथील  पोलिसांना पाचारण करण्यात  आले होते.  ग्रामस्थांच्या मदतीने  मृतदेह  बाहेर  काढले. पोलिसांनी नातेवाईकांना     पंचनामा  करण्यास सांगितले. पण मुलांचे आजोबा लक्ष्मण गायकवाड,  वाहनचालक  प्राथमिक  आरोग्य  केंद्र बोरगाव यांनी पंचनामा  व शवविच्छेदन  करण्यास नकार  दिल्याची  नोंद  पोलिसांनी केली नाही. एवढी मोठी  दुर्घटना  घडूनही त्याची  नोंद सरकारी  दप्तरी झाली  नाही.