Fri, Nov 16, 2018 16:08होमपेज › Nashik › मानवी तस्करी प्रकरणी दोन दलालांना अटक

मानवी तस्करी प्रकरणी दोन दलालांना अटक

Published On: Dec 17 2017 12:04AM | Last Updated: Dec 16 2017 11:48PM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

फसवून भारतात आणलेल्या बांगलादेशी पीडितेस वेश्या व्यवसायासाठी जबरदस्ती केल्याप्रकरणी सिन्नर पोलिसांनी आणखी दोघा दलालांना जुने नाशिक परिसरातून ताब्यात घेत अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वीच सिन्नर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सुरुवातीस या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.  

 आसिफ फारूख शेख (26, रा. चौकमंडई), सिद्धार्थ गौतम सोनकांबळे (21, रा. भीमवाडी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. न्यायालयाने या दोघांना बुधवारपर्यंत (दि.20) पोलीस कोठडी सुनावली आहे.

पीडित तरुणीस तिची मावशी माजिदा अब्दुला हिने खोटे बोलून बांगलादेशमधून बेकायदेशीररीत्या भारतात आणले. त्यानंतर सिन्नरमधील मंगल उर्फ नानी नंदकिशोर गंगावणे हिच्याकडे पीडितेचा ताबा दिला. त्यानंतर संशयित विशाल नंदकिशोर गंगावणे आणि सोनू नरहरी देशमुख यांनी या पीडितेवर बलात्कार केला. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तिघांनाही अटक केली. त्यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून आसिफ आणि सिद्धार्थ या दोघा संशयित दलालांना अटक केली आहे. 
या प्रकरणात अटक केलेल्या संशयितांची संख्या पाच झाली आहे. यात वाढ होण्याची शक्यता असून, पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत. पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी तीन पथके तपासासाठी नियुक्त केली असून, मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील वेश्या व्यवसाय सील करण्यासाठीचा प्रस्ताव दराडे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविला आहे.