Thu, Aug 22, 2019 12:27होमपेज › Nashik › दायित्वाच्या ओझ्यामुळे जादा विषयांना चाप 

दायित्वाच्या ओझ्यामुळे जादा विषयांना चाप 

Published On: Feb 21 2018 1:20AM | Last Updated: Feb 20 2018 11:50PMनाशिक : प्रतिनिधी

महापालिकेवर स्पील ओव्हरचा डोंगर दिवसेंदिवस वाढत असल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महासभेत तब्बल पस्तीसहून जादा विषयांना चाप लावला आहे. त्यामध्ये सिडकोमधील बहुचर्चित पेलिकन पार्क विकसित करणे व पांडवलेणी येथील चित्रमहर्षी दादासाहेब फाळके स्मारक खासगी तत्वावर विकसित करणे, या प्रमुख विषयांचा समावेश आहे. यापुढे दायित्व, तांत्रिक योग्यता पडताळणी व प्राथमिकता या त्रिसूत्रीवरच विकासकामांना मंजुरी दिली जाईल, असे त्यांनी सभासदांना बजावले.

मंगळवारी झालेल्या महासभेत सदस्यांनी विकासकामांचे प्रस्ताव मोठ्या संख्येने मंजुरीसाठी ठेवले होते. मात्र, महापालिकेकडे निधीची चणचण असून, सद्यस्थितीत 850 कोटीहून अधिकचे दायित्व आहे. अशा परिस्थितीत महासभेच्या मंजुरीसाठी कोट्यवधींची कामे ठेवण्यात आली होती. मात्र, महापालिकेची हलाखीची परिस्थिती बघता आयुक्त मुंढे यांनी विविध कामांना ब्रेक लावला. 25 लाखाच्या आतील विकासकामांना मंजुरी देण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत. त्या निकषानुसार मुंढे यांनी पस्तीसहून जादा विषय मागे घेतले. त्यामध्ये प्रामुख्याने मोरवाडीतील 17 एकर जागेवर पीपीपी द्वारा सेंट्रल पार्क उभारणे, फाळके स्मारक विकसित करणे या कामांचा समावेश आहे. शिवाय महिलांसाठी जिम, अभ्यासिका, योगा हॉल, नासर्डी नदीवर आयटीआय पुलास समांतर पूल बांधणे, पेव्हर ब्लॉक बसविणे, रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण, बहुद्देशीय हॉल, रस्ते काँक्रिटीकरण, कब्रस्तान दुरुस्ती,  दलित वस्ती योजने अंतर्गत गटार बांधणे व ड्रेनेज लाइन टाकणे, महापालिका कर्मचार्‍यांसाठी वाहन खरेदी आदी विषयांचा समावेश आहे. कामे रद्द केल्याने नाराज झालेल्या सदस्यांनी आगामी अर्थसंकल्पात कामांसाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी केली.

‘ईईएसएल’ला एलईडीचा ठेका 

डॉ.हेमलता पाटील यांनी एलईडी फिटिंगचा मुद्दा उपस्थित करत निधी परत जाण्याची भीती व्यक्त केली. शहरात एलईडी दिवे लावण्याचा मुद्दा उपस्थित झाल्यावर केंद्र सरकारने नेमलेल्या कंपनीद्वारेच हे काम केले जाईल, असे स्पष्टीकरण आयुक्तांनी दिले. नगरसेवकांनी त्यांनी दिलेल्या एलईडी फिटिंगसाठी दिलेल्या वर्कऑर्डर रद्द करुन तो निधी पोल फिटिंगसाठी वापरावा. संपूर्ण शहरात एलईडी फिटिंगसाठी एकच टेंडर काढले जाईल, असे आयुक्तांनी सांगितले. त्यामुळे वादग्रस्त ‘ईइएसएल’कंपनीला एलईडी फिटिंगचा ठेका दिला जाईल, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. शिवसेनेेने यापूर्वी या कंपनीला ठेका देण्यास विरोध दर्शविला आहे.