Fri, Feb 22, 2019 01:50होमपेज › Nashik › वीज बिल भरण्याऐवजी पत्नीला जाळण्याचा प्रयत्न

वीज बिल भरण्याऐवजी पत्नीला जाळण्याचा प्रयत्न

Published On: Sep 06 2018 10:47PM | Last Updated: Sep 06 2018 10:38PMनाशिकरोड ः वार्ताहर 

जेलरोड येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात पत्नीलाच पेटवण्याचा प्रयत्न एका ग्राहकाने केल्याने खळबळ उडाली. प्रसंगावधान राखत कर्मचार्‍यांनी या इसमाला रोखल्यामुळे अनर्थ टळला. 

नाशिकरोड येथील शारदा बाळकृष्ण दंदणे यांच्या मालकीचा मॉडेल कॉलनीमध्ये स्नेहधारा अपार्टमेंटमध्ये फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये प्रशांत जाधव हे सात महिन्यांपासून भाडेकरू म्हणून राहतात. सहा महिन्यांपासून त्यांनी घराचे वीज बिल भरले नाही. त्यामुळे वारंवार महावितरण कार्यालयाने नोटीस बजावून वेळप्रसंगी कर्मचारी पाठवून समज दिली होती. मात्र, तरीही वीज बिल भरायचे टाळल्याने महावितरण कर्मचार्‍यांनी अखेर वीजपुरवठा खंडित केला. 

बुधवारी (दि.5) सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास प्रशांत जाधव हे पत्नीसह येथील वीज वितरण कार्यालयात  येऊन वीजपुरवठा खंडित का केला? याबाबत हुज्जत घालू लागले. त्यामुळे योगेश आहेर या अभियंत्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. वीज बिल भरा, तुमचे कनेक्शन तत्काळ सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. मात्र, कर्मचार्‍यांचे आणि अधिकार्‍यांचे काहीही न ऐकता प्रशांत जाधव याने आणि त्यांच्या पत्नीने अधिकार्‍यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर प्रशांत जाधव यांनी पत्नीच्या अंगावर पेट्रोलची बाटली ओतली. या घटनेने पत्नी घाबरली आणि त्यानंतर तिने स्वसंरक्षणार्थ वीज वितरण कार्यालयाचा दरवाजा बंद केला.  

कर्मचार्‍यांनी कार्यालयाचा दरवाजा बंद करून प्रशांतला बाहेरच ठेवले. कर्मचार्‍यांच्या प्रसंगावधानाने या महिलेचा जीव वाचला. उपनगर पोलीस ठाण्यात प्रशांत जाधव याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास निरीक्षक प्रभाकर रायते करत आहेत.