Wed, Jul 24, 2019 05:56होमपेज › Nashik › वृक्षतोडीचा दुरुस्त अहवाल मनपा कोर्टात सादर करणार

वृक्षतोडीचा दुरुस्त अहवाल मनपा कोर्टात सादर करणार

Published On: Aug 23 2018 1:28AM | Last Updated: Aug 22 2018 11:04PMनाशिक : ज्ञानेश्‍वर वाघ

नाशिकरोड येथील जेलरोडवर साकारणार्‍या नाट्यगृहाच्या बांधकामास अडथळा ठरत असलेल्या वृक्षांबाबतचा दुरुस्त अहवाल उद्यान विभाग उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. न्यायालयाने यासंदर्भात निरी या संस्थेला सूचना केली होती. त्यानुसार निरीने जागेची पाहणी करून आपला अहवाल उद्यान विभागाकडे सादर केला आहे. 

देवळालीत सर्व्हे नं. 117 वरील आठ हजार स्क्वेअर मीटर जागेवर नाट्यगृहाची इमारत साकारणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियादेखील राबविण्यात आली असून, कामाचा कार्यारंभ आदेश 1 एप्रिल 2017 रोजी देण्यात आलेला आहे. परंतु, वृक्षतोडीस उच्च न्यायालयाची बंदी असल्याने सुमारे दीड वर्षापासून हे बांधकाम रखडले आहे. नाट्यगृहाच्या प्रस्तावित जागेवर पूर्वी 36 इतके मोठे वृक्ष होते. परंतु, गेल्या दीड ते दोन वर्षात या ठिकाणी आणखी वृक्ष वाढल्याने त्यासंदर्भातील दुरुस्त अहवाल न्यायालयास सादर करावयाचा आहे. निरी या संस्थेसह मनपाचा बांधकाम विभाग आणि उद्यान विभागाने संयुक्‍तरीत्या जागेची पाहणी केली असता त्या ठिकाणी आजमितीस 126 इतके छोटे-मोठे वृक्ष आहेत. त्यात काही साग या प्रजातीच्या वृक्षांचा समावेश आहे. इमारत बांधकाम करण्यासाठी अडथळा ठरत असलेल्या वृक्षांची संख्या 36 आहे. यामुळे उर्वरित वृक्षांचा अडथळा ठरत नसल्याने केवळ 36 वृक्षांची कत्तल करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली जाणार आहे. 

न्यायालयाच्या निर्देशानुसार एकास तीन याप्रमाणे वृक्षलागवड करण्याचे प्रतिज्ञापत्रदेखील दुरुस्त अहवालासोबत बांधकाम आणि उद्यान विभागामार्फत न्यायालयास सादर केले जाणार आहे. सहा कोटी 86 लाख रुपये इतकी तरतूद नाट्यगृहासाठी करण्यात आली आहे. 710 इतक्या आसन क्षमतेचे हे नाट्यगृह असेल. म्हणजेच नाशिक शहरातील महाकवी कालिदास कलामंदिर नाट्यगृहाएवढेच हे नाट्यगृह नाशिकरोडमध्ये उभे राहणार आहे. यामुळेच नाट्यगृह साकारण्याकडे नाशिकरोडवासीयांचे लक्ष लागून आहे.