Tue, Mar 19, 2019 15:32होमपेज › Nashik › वाहतूकदार संपामुळे चार लाख क्विंटल कांदा जिल्ह्यातच पडून

वाहतूकदार संपामुळे चार लाख क्विंटल कांदा जिल्ह्यातच पडून

Published On: Jul 24 2018 1:08AM | Last Updated: Jul 24 2018 1:08AMनाशिक : कुंदन राजपूत

मालवाहतूकदारांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाचा फटका मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील कांदा वाहतुकीला बसत आहे. संपामुळे लासलगाव, पिंपळगाव बसवंत व निफाड बाजार समितीतून इतर राज्यांत होणारी कांद्याची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. आजमितीला चार लाख क्विंटल कांदा हा चाळीत पडून आहे. परिणामी इतर राज्यांत कांद्याची आवक घटली असून, तेथे कांद्याचे दर गगनाला भिडण्याची शक्यता आहे. संपावर तोडगा न निघाल्यास इतर राज्यांतील नागरिकांना कांदा पुन्हा रडवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

इंधनाची भरमसाट दरवाढ, अवाजवी टोलआकारणी याविरोधात ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट असोसिएशनने मालवाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवार (दि.20) पासून संपाचे हत्यार उपसले आहे. नाशिक जिल्ह्यातही संपाचे पडसाद उमटताना दिसत आहेत. तब्बल पाच हजारांहून अधिक ट्रक जागेवरच उभे आहेत. नाशिकमधून रोज एक लाख क्विंटल कांदा इतर राज्यांमध्ये विक्रीसाठी नेला जातो. आशियातील कांद्याची सर्वांत मोठी बाजारपेठ असलेली लासलगाव बाजार समिती, पिंपळगाव बसवंत, निफाड या प्रमुख बाजार समितीतून ट्रकद्वारे इतर राज्यांमध्ये कांदा पोहोचवला जातो.

त्यामध्ये प्रामुख्यानेहरयाणा, राजस्थान, दिल्ली, कोलकाता, पंजाब, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यांमध्ये कांदा पुरवठा केला जातो. मात्र, मागील चार दिवसांपासून वाहतूकदारांचा संप सुरू असून, कांद्याची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. रोज जिल्ह्यातून साधारणत: एक लाख टन कांदा इतर राज्यांमध्ये पाठवला जातो. संपामुळे एकही ट्रक कांद्याची वाहतूक होऊ शकलेली नाही. त्यामुळे चार लाख टन कांदा जिल्ह्यातील बाजार समितीत पडून आहे. परिणामी इतर राज्यांमध्ये होणारी आवक घटल्याने त्या ठिकाणी कांद्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. सरकारकडून मालवाहतूकदारांचा संप मिटविण्यासाठी अद्याप कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाही, असा आरोप केला जात आहे. त्यामुळे वाहतूकदार संपावर ठाम आहेत. पुढील एक दोन दिवसांत कांद्याचा पुरवठा सुरळीत न झाल्यास तेथे कांद्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी पुढील काळात कांदा अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणू शकतो.

संपामुळे इतर राज्यांत होणारी कांद्याची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. चार लाख क्विंटल कांदा हा जिल्ह्यातच पडून आहे. इतर राज्यांत कांद्याचा पुरवठा घटला असून, दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. तर नाशिक जिल्ह्यात कांद्याचे दर पडण्याची शक्यता आहे.

- सोहनलाल भंडारी,  कांदा व्यापारी संघटना