Tue, Apr 23, 2019 02:17होमपेज › Nashik › पोलिसाच्या अंगावर रिक्षा घालणार्‍यास सक्‍तमजुरी  

पोलिसाच्या अंगावर रिक्षा घालणार्‍यास सक्‍तमजुरी  

Published On: Jan 17 2018 2:02AM | Last Updated: Jan 16 2018 10:50PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

शालिमार चौक येथे महिला वाहतूक पोलिसाला धक्‍काबुक्की करून त्यांच्या अंगावर रिक्षा घातल्याप्रकरणी आरोपी सुनील बाळू देशमुख यास न्यायालयाने दोषी ठरवले असून, दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. न्यायदंडाधिकारी ए. एम. शहा यांनी मंगळवारी (दि.16) ही शिक्षा सुनावली. ही घटना 25 मे 2010 रोजी घडली आहे.

वाहतूक पोलीस सुशीला एम. सहारे या शालिमार चौक येथे ड्युटीवर होत्या. त्यावेळी मेनरोडकडून क्षमतेपेक्षा जादा प्रवासी घेऊन विनानंबर प्लेटची रिक्षा येत होती. सहारे यांनी ही रिक्षा थांबवत कागदपत्रांबाबत विचारणा केली. त्यावेळी रिक्षाचालक देशमुख याने घटनास्थळी आरडाओरड करून लोकांची गर्दी जमवली. ‘तुला काय करायचे ते कर, मी रिक्षा वाहतूक कार्यालयाला नेणार नाही, असे सांगून वाहतूक पोलीस सहारे यांना धक्काबुक्की करून त्यांच्या अंगावर रिक्षा घालून पळ काढला होता. या प्रकरणी सहारे यांनी आरोपी देशमुखवर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची मंगळवारी न्यायदंडाधिकारी शहा यांच्यासमोर सुनावणी झाली. आरोपीविरुद्ध फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष तपासून देशमुखला दोषी ठरविण्यात आले. त्यास एक वर्षे सक्तमजुरी  व 506 कलममध्ये सहा महिने सक्‍तमजुरी अशी एकूण दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठाविण्यात आली. सरकारी पक्षातर्फे सहायक सहकारी अभियोक्ता एस.पी.बंगले यांनी कामकाज पाहिले.