Thu, Apr 25, 2019 18:52होमपेज › Nashik › ट्रॅक्टर उलटून २८ शेतमजूर जखमी

ट्रॅक्टर उलटून २८ शेतमजूर जखमी

Published On: Jan 08 2018 1:14AM | Last Updated: Jan 07 2018 11:47PM

बुकमार्क करा
कळवण : वार्ताहर

तालुक्यातील जयदर खडकी शिवारात रविवारी (दि.7) सकाळी 9.30 च्या सुमारास शेतमजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटल्याने 28 शेतमजूर जखमी झाले आहेत. जखमींना जयदर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता, तेथे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने आदिवासी रुग्णांची हेळसांड झाली. त्यामुळे गैरहजर राहणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी सुळे येथील सरपंच चंद्रकांत गवळी यांनी केली आहे.

कळवण तालुक्यात सर्वत्र कांदा लागवडीचा हंगाम जोमात सुरू आहे. काठारा येथून खडकी येथे कांदा लागवडीसाठी शेतमजूर ट्रॅक्टरने जात होते. खडकी शिवारात ट्रॅक्टर अचानक उलटल्याने 28 शेतमजूर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या जयदर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता, येथे वैद्यकीय हजर नसल्याने आदिवासी रुग्णांची हेळसांड झाली आहे. अखेर सर्व रुग्णांना जयदर येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार घेऊन खासगी वाहनांनी अभोणा व कळवण येथील रुग्णालयात जावे लागले. या घटनेमुळे तालुक्याच्या पश्‍चिम आदिवासी भागातील आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. 

मुख्यालयाला कुठलीही कल्पना न देता बेजबाबदारपणे दांड्या मारणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍याला तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी सरपंच चंद्रकांत गवळी, उपसरपंच भावडू गायकवाड, पोपट गायकवाड, उत्तम भोये, राजेंद्र गायकवाड आदींनी केली आहे.