Fri, Apr 26, 2019 09:23होमपेज › Nashik › टोइंगवाल्यांची मगरुरी सुरूच

टोइंगवाल्यांची मगरुरी सुरूच

Published On: Apr 29 2018 2:08AM | Last Updated: Apr 28 2018 11:23PMनाशिक : प्रतिनिधी

नो-पार्किंगमधील वाहने उचलणार्‍या टोइंग व्हॅनवरील कर्मचार्‍यांची मगरुरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महात्मा गांधी रोडवर सलग दुसर्‍या दिवशीही टोइंगवाल्यांनी महिलेस अरेरावी करीत जागेवर दंड भरून घेण्यास टाळाटाळ केली. नागरिकांनी वर्गणी गोळा करून दंडाची रक्‍कम भरल्यानंतरही टोइंगवाल्यांनी ‘शेवटी भीक मागूनच दंड भरला ना?’ असे बोलल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याउलट वाहतूक पोलिसांचे टोइंग कारवाईकडे होणार्‍या दुर्लक्षामुळे आर्थिक गैरव्यवहारांच्या चर्चांना अप्रत्यक्षरीत्या पुष्टी मिळत आहे. 

महात्मा गांधी रोडवरील एका लॅबमध्ये मुलाच्या आजारपणाचे निदान करण्यासाठी एक्स रे काढण्यासाठी आलेल्या महिलेचे वाहन शुक्रवारी (दि.27) टोइंग करण्यात आले होते. त्यावेळी महिलेने जागेवरच दंड भरण्याची तयारी दर्शवली तरीदेखील टोइंगवाल्यांनी जागेवर दंड घेण्यास नकार दिला होता. त्यावेळीही नागरिकांनी संताप व्यक्‍त केला. सरकारवाडा पोलिसांनी मध्यस्थी करीत तसेच दंड भरल्यानंतर महिलेचे वाहन सोडवण्यात आले होते. त्यानंतर दुसर्‍याच दिवशीच शनिवारी (दि.28) सायंकाळी सहाच्या सुमारास पुन्हा तसाच प्रकार घडल्याने टोइंगवाल्यांविरोधात संताप व्यक्‍त होत आहे. सिडको येथील एका महिलेची दुचाकी टोइंग कारवाईत उचलल्यानंतर नागरिकांनी त्यास विरोध केला. तसेच जागेवरच दंड घ्या अशी भूमिका घेतली.

त्यास टोइंगवाल्यांनी नकार दिल्याने नागरिकांचा रोष वाढला. नागरिकांनी वर्गणी गोळा करून दंडाची रक्‍कम दिली, तर वर्गणी गोळा करून पैसे का देतात   असे टोइंगवरील कर्मचारी बोलले. दरम्यान, शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांनीही जागेवरच दंड घ्या, अशी भूमिका घेतली. वाहतूक पोलिसाने खिडकीची काच लावून घेत वाहन देण्यासही नकार दिल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सरकारवाडा पोलीस आणि टोइंग ठेकेदाराकडील एक व्यक्‍ती आल्यानंतर मध्यस्थीचा तोडगा काढण्यात आला. महिलेने वर्गणीतून आलेले पैसे देत दंड भरला व गाडी सोडवून घेतली. मात्र, या घटनांनी नागरिकांनी संताप व्यक्‍त केला आहे.