होमपेज › Nashik › तीन नगरसेवकांसह ४० जणांवर तडीपारी

तीन नगरसेवकांसह ४० जणांवर तडीपारी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा


नाशिक : प्रतिनिधी

लोकप्रतिनिधी होताच कायद्याला पायदळी तुडवत गुन्हेगारांना पोसणे, गंभीर गुन्ह्यांत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग, कोणत्याही कारवाईत दडपण आणणे, अशी कृत्ये करणार्‍या लोकप्रतिनिधींवर शहर पोलिसांनी तडीपारी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार किमान तीन नगरसेवकांसह त्यांच्या कट्टर समर्थक म्हणवणार्‍या तब्बल 40 गुन्हेगारांवर येत्या काही दिवसांत तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे. यात नाना, भाऊ, अण्णा म्हणून ओळखल्या जाणार्‍या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा समावेश असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे.

शहरात झालेल्या खून, खंडणी, प्राणघातक हल्ले यांसारख्या गंभीर गुन्ह्यांत तसेच जुगार अड्डे, अवैध धंदे चालवण्यात अनेक लोकप्रतिनिधींचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सहभाग असल्याचे आढळून आले आहे. त्यातच काही लोकप्रतिनिधींनी कायद्याला न जुमानता पोलिसांनाच उघड आवाहन देत कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचेही प्रयत्न केल्याचे प्रकरण घडले. या लोकप्रतिनिधींना धडा शिकवण्याचा चंग शहर पोलिसांनी बांधल्याचे दिसत आहे. यासाठी पोलिसांनी काही लोकप्रतिनिधींचा ‘इतिहास’ तपासून त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या यादीवरील धूळ झटकण्याचे काम सुरू केले आहे. या गुन्ह्यांचा तपास कुठवर आला असून, त्यात कोणत्या त्रुटी आहेत, गुन्ह्यांतून संशयित मोकळे सुटता कामा नये यासाठी पोलिसांनी बारीक सारीक तपासावर भर देण्यास सुरुवात केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. त्यातच काही लोकप्रतिनिधींवर जरब राहावी यासाठी पहिल्या टप्प्यात तब्बल 34 लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या कट्टर समर्थक म्हणवणार्‍या गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे. त्यात झोन वन म्हणजे शहरामधील 24 तर झोन दोन म्हणजे उपनगरातील 16 जणांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यानेही या वृत्तास दुजोरा दिला असून, गोपनीयतेच्या नावाखाली मात्र नावे सांगण्यास नकार दिला. ही कारवाई होणार असलेल्या आजी-माजी लोकप्रतिनिधींमध्ये बहुतांशी सर्वपक्षीयांचा समावेश असून, शहर पोलीस त्यांच्या समर्थकांनाही दणका देण्याच्या तयारीत आहेत.