Wed, Jun 26, 2019 11:22होमपेज › Nashik › नाशिकमध्ये हजारोंनी लुटला मडबाथचा आनंद

नाशिकमध्ये हजारोंनी लुटला मडबाथचा आनंद

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : पुढारी ऑनलाईन

नाशिक-पेठरोडवरील तवलीफाट्याजवळ सालाबादप्रमाणे आयोजित मडबाथचा अबाल वृद्धांसह हजारो लोकांनी आनंद लुटला. संगीताच्या तालावर नाचून लोकांनी आपला आनंद व्यक्त केला. लोकांच्या संपूर्ण शरीरावर चिखलाचा थर पाहून दुर्गमभागातून हे सारे लोक आले किंवा काय असेच या भागातून येणाऱ्या जाणाऱ्याला वाटत होते. आपल्या लोकांनाही ओळखणे कठीण जात होते, असा हा नजारा होता.

महेशभाई शहा तसेच योग गुरुजी आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदू देसाई यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या २० वर्षांपासून या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मुंबई, पुणे तसेच राज्याच्या काही भागातील आणि नाशिक महानगरातील सुमारे १००० लोकांनी मडबाथचा आनंद लुटला. 

हनुमान जयंतीनंतर पहिल्या रविवारी आयोजन

हनुमानजयंतीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी सालाबादप्रमाणे हा कार्यक्रम असयोजित करण्यात येतो. महिनाभर आधीपासून या कार्यक्रमाची तयारी केली जाते. वारुळाची माती गोळा केली जाते. आठ दिवस आधी ही माती भिजवली जाते. संपूर्ण शरीराला माती लावून आंघोळ करण्यामागचे शास्त्रीय कारण म्हणजे याने शरीरातील सर्व उष्णता निघून जाते आणि त्वचा चकचकीत होते, असे नंदू देसाई यांनी सांगितले.

सकाळी ७ वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरु झाला. बघता बघता लोकांचे थवेच्या थवे येथे येऊ लागले आणि स्वतःच्या अंगाला चिखल फासू लागले. नंतर एक तास उन्हात चिखल वाळल्यानंतर तेथे खास बसविण्यात आलेल्या शॉवरखाली तर काहींनी विहिरीत यथेच्छ पोहून मडबाथचा आनंद लुटला. संगीताच्या तालाने या कार्यक्रमाला आगळी रंगत आली होती. मडबाथ घेणाऱ्या मान्यवरांमध्ये ज्येष्ठ पोलिस अधिकारी हरिष बैजल, नवलनाथ तांबे, भाजपाचे महानगर सरचिटणीस उत्तमराव उगले, नगरसेवक ॲड. श्याम बडोदे, विशाल उगले, ॲड.वैभव शेटे,राजेंद्र फड, डॉ.ज्ञानेश्वर चोपडे, अमित घुगे, डॉ.विश्वास सावकार आदींचा समावेश होता. मडबाथनंतर मिसळपार्टीचाही सर्वांनी आनंद लुटला.

Tags : nashik, nashik news, mud bath


  •