Fri, May 24, 2019 20:59होमपेज › Nashik › नागरिकांच्या सतर्कतेने चोरीचा प्रयत्न फसला

नागरिकांच्या सतर्कतेने चोरीचा प्रयत्न फसला

Published On: Mar 16 2018 1:22AM | Last Updated: Mar 16 2018 1:22AMओझर : वार्ताहर

येथील पंचवडनगर येथील साईधाम भागात चोरीच्या उद्देशाने दुचाकीवर फिरत असलेल्या चोरट्यांचा सजग नागरिकांना संशय आला होता. त्यांनी ओझर पोलीस ठाण्याला बाब कळवली. गुन्हे शाखेचे  कर्मचारी वेळीच घटनास्थळी आल्याने चोरट्यांचा घरफोडी करण्याचा प्रयत्न फसला. त्यांनी चोरलेली दुचाकी जागेवरच टाकून पळ काढला.

गेल्या काही महिन्यांपासून ओझर शहराच्या उपनगरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बंद घरे हेरून चोरट्यांकडून रात्री-दिवसा घरफोडी करण्याचा प्रकार वाढीस लागलेला आहे. परिसरातील वाढत्या चोर्‍या रोखण्यासाठी पोलीस उपअधीक्षक अतुल झेंडे, ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार उपाशे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे, सहाय्यक उपनिरीक्षक माळोदे, अनुपम जाधव, अनिल काळे, अरुण गायकवाड यांनी रेणुकानगर, धामटनगर, पंडित कॉलनी भागात रात्रीची गस्त वाढवली होती. दोन वाजता गस्त घालत असताना दोन संशयित पंचवडनगर, साईधाम भागात मोटारसायकलवर फिरताना आढळले. त्यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. या संशयितांना त्याची कुणकुण लागली. त्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन या मोटारसायकल सोडून पळ काढला. पोलिसांनी मोटारसायकल मालकाचा शोध घेतला असता सदर मोटारसायकल याच परिसरातील एका रहिवाशाची चोरलेली असल्याचे स्पष्ट झाले. चोरट्यांनी मोटारसायकल लंपास करून घरफोडीचा प्रयत्न केला असल्याचे स्पष्ट झाले होते.