Tue, Apr 23, 2019 20:12होमपेज › Nashik › मनपाच्या मालमत्ताकरात करवाढीमुळे मोठी वृद्धी

मनपाच्या मालमत्ताकरात करवाढीमुळे मोठी वृद्धी

Published On: May 31 2018 1:43AM | Last Updated: May 30 2018 10:30PMनाशिक : प्रतिनिधी

मालमत्ता करावरील 18 टक्के वाढ आणि थकीत मालमत्तांचा लिलाव यामुळे मनपाच्या महसुलात मागील वर्षापेक्षा वाढ झाली आहे. वाढीव करानुसार मालमत्ताधारकांना बिलांचे वाटप झाल्याने जून महिन्यात कर वसुलीच्या प्रमाणात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. 

मागील वर्षी एप्रिल ते 30 मेपर्यंत मालमत्ता करापोटी 27 कोटी रुपये वसूल झाले होते. याच कालावधीत या आर्थिक वर्षात 30 कोटी रूपये म्हणजे जवळपास तीन कोटी रूपये मनपाच्या तिजोरीत जादा जमा झाले आहेत. मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी करवाढ करतानाच नियमित कर भरणार्‍यांना सुरू असलेली सवलत बंद केली होती. यामुळे त्याचा परिणाम एप्रिल 2018 मध्ये दिसून आला. एप्रिल महिन्यात केवळ 9 कोटी रुपयेच जमा झाले. याच महिन्यात मागील वर्षी 18 कोटी 95 लाख रुपये मनपाला मिळाले होते. अर्थात, एप्रिल महिन्याची कसर मे महिन्यात भरून निघाली. करवाढीमुळे मे महिन्यात 21 कोटी 16 लाख रुपये महसूल प्राप्‍त झाला. याच महिन्यात मागील वर्षी 8 काटी 79 लाख रुपये जमा झाले होते. योग्य वेळी ग्राहकांच्या हाती बिले वाटप झाल्याने तसेच करवाढीमुळे महसूल अधिक जमा झाल्याचे उपायुक्‍त रोहिदास दोरकुळकर यांनी सांगितले. त्याचबरोबर कर थकबाकी असलेल्या 100 मालमत्तांचा लिलाव मागील महिन्यात मनपाने ठेवला होता.

त्यासंदर्भात लिलावाची नामुष्की येऊ नये म्हणून थकबाकीदार असलेल्या मालमत्ताधारकांनी थकबाकी भरली होती. ही रक्‍कम जवळपास एक कोटीपर्यंत जाते. हे देखील महसूल जादा जमा होण्याचे एक कारण आहे. एप्रिल, मे आणि जून महिन्यात कर भरणा करणार्‍या नागरिकांना सवलत दिली जाते. यामुळे या तीन महिन्यात कर भरणार्‍यांची संख्या अधिक असते. परंतु, आता ही सवलत बंद झाल्याने ग्राहकांकडून कर भरण्यास यापुढच्या काळात विलंब होऊ शकतो. तसेच बिल मिळाल्यापासून 90 दिवसात बिल भरण्यासाठी मुदत दिली जाते. त्यानंतर शास्ती (दंड) लागू केली जाते.