Fri, Apr 26, 2019 04:14होमपेज › Nashik › अखेर नाशिकमधून विमानसेवा सुरू

अखेर नाशिकमधून विमानसेवा सुरू

Published On: Dec 24 2017 1:45AM | Last Updated: Dec 24 2017 1:45AM

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

नाशिककरांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असणारी विमानसेवा अखेर शनिवारी (दि.23) सुरू झाली. 

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर पुण्यासाठी पहिले विमान रवाना झाले. सायंकाळी 6.20 ची वेळ असताना तब्बल दोन तास उशिराने म्हणजे 8 वाजून 20 मिनिटांनी पहिले विमान आकाशात झेपावले. पहिल्या दिवशी नाशिकहून 13 प्रवासी पुण्याला रवाना झाले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, केंद्रीय नागरी उड्डाण विभागाचे सचिव आर. एन. चौबे, एअर डेक्कनचे अध्यक्ष गोपीनाथ आदी उपस्थित होते. नाशिकहून सुरू झालेली सेवा यापुढे अखंडित सुरू राहणार असल्याची माहिती गोपीनाथ यांनी दिली. उडानच्या दुसर्‍या टप्प्यात देशातील 67 शहरांमध्ये हवाई सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे गोपीनाथ यांनी सांगितले.     

हवाई सेवेसाठी नाशिक पोषक : चौबे

हवाईसेवेसाठी नाशिकमध्ये पोषक वातावरण असून, भविष्यात ओझर विमानतळावरून दिवसाला दहा विमानांचे उड्डाण होऊ शकते, असा विश्‍वास केंद्रीय नागरी उड्डाण विभागाचे सचिव आर. एन. चौबे यांनी व्यक्‍त केला. नाशिकमधून शनिवारी विमानसेवा सुरू झाली असली तरी ती अखंडित सुरू रहावी, यासाठी नाशिककरांनी सहकार्य करावे, असे आवाहनही चौबे यांनी केले. मुंबई विमानतळावरील व्यस्त वेळापत्रक बघता नाशिकचे विमानतळ हे भविष्यात चांगला पर्याय ठरू शकते. ओझर विमानतळावर 200 प्रवासी क्षमता असून, त्यासाठी टर्मिनलमध्ये आणखी काही पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे मत चौबे यांनी व्यक्‍त केले. एअर डेक्‍कनने जाहीर केलेल्या लकी ड्रॉमध्ये 1 रुपयात प्रवास करणार्‍या स्नेहा जो भाग्यवान प्रवासी ठरल्या. तर पहिले तिकीट बुकिंग करणारे मनोज रॉय यांना तिकीट देऊन गौरवण्यात आले.

विमान उड्डानासाठी नाशिकचे वातावरण पोषक आहे. या ठिकाणाहून दिवसातून 10 उड्डा होऊ शकतात. मात्र, त्यासाठी नाशिककरांची साथ आवश्यक आहे. पुढील काळात इतर ठिकाणांसाठी सेवा सुरू करता येईल. 
- आर. एन. चौबे, सचिव, नागरी उडान विभाग

मुंबई विमान तळावर नेहमीच गर्दी असते. त्यामुळे मुंबईला पर्याय म्हणून नाशिककडे पाहता येईल. उडान योजनेअंर्तगत अजून 67 शहरे जोडणार आहे.    - गोपिनाथ, अध्यक्ष, एअर डेक्कन 

उडान योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. या योजनेतंर्गत देशातील अनेक शहरे जोडली जात आहे. याच योजनेतंर्गत नाशिकडून विमानसेवा सुरू झाली आहे.
- गिरीश महाजन, पालकमंत्री

नाशिकहून यापूर्वीही विमानसेवा सुरू झाल्या होत्या. मात्र उड्डाणाच्या वेळा चुुकीच्या असल्याने त्या सेवा बंद पडल्या. आताची सेवा उडान योजनेअंर्तगत असून प्रवाशांना तिकीट दरात सबसिडी मिळत असल्याने ही सेवा शाश्‍वत सुरू राहील.         - हेमंत गोडसे, खासदार