Thu, Apr 18, 2019 16:01होमपेज › Nashik › मनपातील ताण-तणावाप्रसंगी संघटना, नगरसेवकांची चुप्पी

मनपातील ताण-तणावाप्रसंगी संघटना, नगरसेवकांची चुप्पी

Published On: May 30 2018 2:21AM | Last Updated: May 29 2018 11:33PMनाशिक : प्रतिनिधी

मनपातील सध्याचे वातावरण पाहता सर्वच कर्मचारी आणि अधिकारी ताण-तणावाखालीच काम करत आहेत. यावर मनपाच्या कर्मचारी संघटना मूग गिळून बसल्या आहेत, तर आचारसंहितेचे नाव पुढे करून नेहमीच आपल्या राजकीय स्वार्थासाठी भोकाड पसरणारे नगरसेवक आणि पदाधिकारीही शांत बसून सर्व गंमत पाहत आहेत. कर्मचारी वा अधिकार्‍यांना काही अडचण किंवा तक्रारी असेल तर त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा आम्ही त्यांच्या पाठीशी असल्याचे महापौर रंजना भानसी यांनी सांगत कर्मचार्‍यांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. 

महापालिकेतील सर्व स्थितीची जाणीव नगरसेवकांसह पदाधिकारी व महापौरांना नाही असे नाही. असे असताना कर्मचारी व अधिकार्‍यांनीच आपल्याकडे यावे. त्यानंतरच आपण त्यांच्यासाठी काहीतरी पाऊल उचलू, असा महापौरांसह त्यांच्या कारभार्‍यांचा आग्रह कशासाठी? गेल्या अडीच तीन महिन्यांपासून प्रशासनाच्या कामकाजामुळे केवळ कर्मचारी आणि अधिकारीच हैराण झालेले नाही तर नगरसेवक, पदाधिकारी आणि आमदारही भाजून निघाले आहेत. एकाएका निर्णयामुळे महापालिकेत नगरसेवकांचे येणे जवळपास बंद झाले आहे. अनेक विकासकामे रद्द झाली आहेत. विकासकामांचे प्रस्ताव महासभेत येणे थांबले आहे.

अशी सर्व स्थिती असताना आपल्याला महापालिकेतील काहीच माहिती नाही, असे खुद्द महापौरांनी म्हटल्याने आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. बहीण म्हणून सहायक अभियंता रवी पाटीलसह सर्व कर्मचारी व अधिकार्‍यांच्या पाठीशी आपण उभे राहू, असे महापौर सांगत असेल तर कुणी आपल्याकडे येण्याची वाट बघण्याचे कारण काय? आजमितीस एकही कामाची नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर कर्मचार्‍यांवर अन्याय होऊनही सर्व संघटनांचे पदाधिकारी व कारभारी हातावर हात धरून बसले आहेत. इतरवेळी एखाद्या छोट्या घटनेचेही भांडवल करून जनतेला आणि प्रशासनाला वेठीस धरणार्‍या संघटनाही शेपूट घालून बसल्याने कर्मचार्‍यांकडून नाराजी व्यक्‍तकेली जात आहे. 

सोशल मीडियावरून आवाहन 

बेपत्ता झालेले अभियंता रवींद्र पाटील यांनी पुन्हा यावे यासाठी मनपातील काही कर्मचारी सोशल मीडियावरून आवाहन करत आहेत. यामुळे सोशल मीडियातील या आवाहनाला मोठा प्रतिसाद लाभत असून, महापालिकेतील प्रशासनाच्या कामकाजाच्या विरोधात आपला संताप कर्मचार्‍यांकडून व्यक्‍त केला जात आहे. 

संघटनांचे हातावर हात

महापालिकेत सतराशेसाठ कर्मचारी संघटना आहेत. परंतु, आजमितीस एकही कामाची नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर कर्मचार्‍यांवर अन्याय होऊनही सर्व संघटनांचे पदाधिकारी व कारभारी हातावर हात धरून बसले आहेत. इतरवेळी एखाद्या छोट्या घटनेचेही भांडवल करून जनतेला आणि प्रशासनाला वेठीस धरणार्‍या संघटनाही शेपूट घालून बसल्याने कर्मचार्‍यांकडून नाराजी व्यक्‍तकेली जात आहे.