Fri, Mar 22, 2019 05:49
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › शिक्षक मतदारसंघातही  सेना-भाजपा आमनेसामने

शिक्षक मतदारसंघातही  सेना-भाजपा आमनेसामने

Published On: Jun 03 2018 1:17AM | Last Updated: Jun 02 2018 10:42PMनाशिक : प्रतिनिधी

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीचा सामना खर्‍या अर्थाने शिवसेना आणि भाजपामध्येच रंगल्यानंतर आता पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही हे दोन्ही पक्षच झुंजणार असल्याचे दिसून येते. काँग्रेसने हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटल्याचे स्पष्ट केले असले तरी राष्ट्रवादीला मात्र प्रदेशपातळीवरील आदेशाची प्रतीक्षा आहे.

पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पदवीधर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक येत्या येत्या 25 जूनला होणार आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने अजूनपर्यंत अधिकृतरित्या उमेदवार जाहीर केला नसला तरी पडद्यामागील सुप्त हालचालींना मात्र वेग आला आहे. शिवसेनेने नवनिर्वाचित आमदार नरेंद्र दराडे यांचे बंधू तथा  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक किशोर दराडे यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्‍चित केले आहे. सेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी दराडे यांची प्राथमिक चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. दराडे यांना उमेदवारी जाहीर करण्यास ठाकरे स्वत: उत्सुक असताना दराडे यांनी मात्र ऐनवेळी उमेदवारी जाहीर करण्याचे सूचविले होते. दुसरीकडे दराडे यांनी तयारी सुरू केली असून, त्यांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. भाजपाने अनिकेत पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्याचे आमदार बाळासाहेब सानप यांनी सांगितले. 

दोन्ही काँग्रेसच्या गोटात मात्र अद्यापही शांतताच दिसून येत आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाप्रमाणेच शिक्षक मतदारसंघाचीही जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. त्यामुळे उमेदवार देण्याचा निर्णय राष्ट्रवादीनेच घ्यावा, असेही सांगण्यात आले. दुसरीकडे राष्ट्रवादीचे स्थानिक नेते मात्र वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भुमिकेत दिसून आले. निवडणूक लढविण्यासंदर्भात प्रदेशपातळीवरून अद्याप कोणत्याही प्रकारचे आदेश प्राप्त झाले नसल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. 

दरम्यान, राष्ट्रवादीने उमेदवार दिला तरी खरा सामना सेना आणि भापाच्याच उमेदवारांमध्ये रंगण्याची चिन्हे आहेत. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपाचा उमेदवार नसला तरी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या भाजपेयींच्या निर्णयामुळे ही निवडणूक सेना विरोधात भाजप अशीच झाली होती. सेनेने भाजपाची मते फोडत विजयश्री खेचून आणल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव भाजपाच्याच नेत्यांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उट्टे काढण्याची संधी भाजपा साधू शकते, असे जाणकारांचे म्हणणे असून तसेच झाल्यास ही निवडणूकही चुरशीची ठरणार असल्याची चिन्हे आहेत.