होमपेज › Nashik › तीन जि. प. शाळेत गुरुजीच नाहीत!

तीन जि. प. शाळेत गुरुजीच नाहीत!

Published On: Jun 30 2018 1:18AM | Last Updated: Jun 30 2018 12:12AMयेवला : प्रतिनिधी

जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांची बदली व शाळांच्या समस्या हा विषय नेहमीच चर्चेचा असतो. मात्र, प्रशासनाच्या  हलगर्जीपणामुळे येवला तालुक्यातील तीन जिल्हा परिषद शाळांना एकही शिक्षक मिळालेला नाही. तर काही ठिकाणी एक-दोन शिक्षक कमी आहेत. पंधरा दिवसांपासून  शाळा सुरू होऊनही शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे प्रशासनाने तातडीने नवीन शिक्षकांची नियुक्‍ती करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

येवला तालुक्यात चालू शैक्षणिक वर्षात शिक्षकांच्या झालेल्या बदल्या या प्रशासनाच्या हलगर्जीपणा व चुकीच्या नियोजनामुळे झाला, असा आरोप करीत येवला तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना पुरेसे शिक्षक, तर काही ठिकाणी एकही शिक्षक नसल्याची तक्रार मोहन शेलार यांनी   केली आहे. येवला तालुक्यातील मोठी घनमाणी मळा, मुरुमी आणि चांदगाव या तीन ठिकाणी असलेल्या जि. प. शाळेमध्ये एकाही शिक्षकाची नियुक्‍ती झालेली नाही. या ठिकाणी एकही शिक्षकाची नियुक्‍ती नसल्याने गेल्या 10-15 दिवसांपासून शेजारील गावाच्या शाळेतील शिक्षकांना पाठवून तात्पुरत्या स्वरूपात शाळा सुरू आहेत.

मुरमी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 90 विद्यार्थी असून, या शाळेला एकूण तीन शिक्षकांची आवश्यकता आहे. परंतु झालेल्या बदल्यांमुळे अद्याप या शाळेला कायमस्वरूपी असे शिक्षक आलेले नसल्याने या शाळेला  कायमस्वरूपी तीन शिक्षक पाहिजे, अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी केली आहे. 

शिक्षक नसल्यामुळे या शाळेला ग्रामस्थांनी कुलूपही लावले होते. यावर अधिकार्‍यांनी आठ दिवसांत आम्ही शिक्षक तुम्हाला देतो, असे आश्‍वासन ग्रामस्थांना दिले. मात्र, अद्यापही शासनाकडून किंवा प्रशासनाकडून या शाळेला शिक्षक मिळालेले नाही, अशी तक्रारही मुरमी येथील संदीप शिंदे यांनी केली आहे. प्रशासनाने जर लक्ष घातले नाही आणि त्वरित या ठिकाणी आवश्यक शिक्षकांची नेमणूक केली नाही तर विद्यार्थ्यांचे दाखले घेऊन या ठिकाणच्या शाळा कायमस्वरूपी बंद करण्याच्या आंदोलनाचा निर्णय सर्व पालकांनी घेतला आहे.