Sun, May 19, 2019 14:20
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › आयुक्‍त बॅकफूटवर,  भाजपा अविश्‍वासावर ठाम

आयुक्‍त बॅकफूटवर,  भाजपा अविश्‍वासावर ठाम

Published On: Aug 31 2018 1:40AM | Last Updated: Aug 31 2018 12:05AMनाशिक : प्रतिनिधी

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लागू केलेल्या करवाढीविरोधात सत्ताधारी भाजपाने थेट आयुक्तांविरोधात अविश्‍वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर मुंढे खुर्ची वाचविण्यासाठी काहीसे नरमले असून, त्यांनी गुरुवारी शुद्धीपत्रक काढत करयोग्य मूल्य दरात सुमारे 50 टक्‍के  मागे कपात करत असल्याचे जाहीर केलेे. तसेच, याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतल्याचा दावाही केला आहे.

नाशिक महापालिकेत आयुक्त म्हणून आलेले तुकाराम मुंढे यांनी आल्यापासून आपल्या कामाचा धडाका लावत प्रशासनाला शिस्त लावली. मात्र, हे करत असताना त्यांनी शहरातील घरपट्टी करात भरमसाठ वाढ करतानाच मोकळे भूखंड, शैक्षणिक संस्था, वसतिगृहे यांच्यासह पिवळ्या पट्ट्यातील शेतीलाही यामध्ये समाविष्ट केल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. विशेष म्हणजे नागरिकांचा या दरवाढीला विरोध झाल्याने दरवाढ रद्द करण्याचा ठराव महासभेत करण्यात आल्यानंतरही महापालिकेने काही मिळकतधारकांना नवीन दराने नोटिसा पाठविल्या आहेत. त्यानंतर या विरोधात सत्ताधारी भाजपाने आयुक्त तुकाराम मुंढे विरोधात अविश्‍वास प्रस्ताव दाखल करत 1 सप्टेंबर रोजी महासभा बोलाविली आहे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर नाशिकमध्ये विविध संस्था, संघटनांकडून महापौराच्या या भूमिकेविरोधात समर्थन देणारी निवेदने महापौरांकडे सादर केली जात आहेत तर सोशल मीडियातून आयुक्त मुंढे यांच्या समर्थनार्थ वातावरण निर्मिती केली जात आहे. तर विरोधक असलेल्या शिवसेनेने आयुक्तांनी करयोग्य मूल्य दरात आयुक्तांनी सकारात्मक निर्णय घेतल्यास अविश्‍वास ठरावाच्या पाठिंब्याबाबत विचार करू अशी भूमिका मांडली होती. या पार्श्‍वभूमीवर आयुक्त हे करवाढीबाबत काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले होते.

दरम्यान, आयुक्त मुंढे यांनी मिळकती, वाढीव बांधकामे, भाडेकरू, जमिनी इत्यादीबाबत करयोग्य मूल्य ठरविताना केलेली वाढ केवळ नव्याने निर्माण होणार्‍या मिळकती, बांधकामे, वाढीव बांधकामे, भाडेकरी व जमिनींनाच लागू असून, याबाबत पदाधिकारी, प्रसार माध्यमांना समजून न घेता त्याचा विपर्यास केल्याचा आरोप केला आहे. तसेच, जनतेची भावना, महासभेचा निर्णय आदींच्या भावनांचा विचार करून निर्धारित दरवाढ 25 ते 50 टक्के दरम्यान वाढ कमी केल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयानंतर महापालिकेच्या राजकीय वर्तुळात अविश्‍वास ठराव मागे घ्यावा की रेटला जावा याबाबत राजकीय पक्षांमध्ये खलबते सुरु झाले आहेत.

भाजपा नगरसेवकांची आज बैठक

करयोग्य मूल्य दरात 50 टक्के कपात केल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापौर रंजना भानसी यांनी प्रतिक्रिया देताना 50 आयुक्तांनी संपूर्ण करवाढ मागे घ्यावी, अशी आपली मागणी असून शनिवारी (दि.1) महासभा होणार असून, या सभेतच अविश्‍वासाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले तर सभागृह नेते दिनकर पाटील यांनी आयुक्तांनी शुद्धीपत्रकाच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल केली असल्याचे सांगत अविश्‍वास ठरावावर भाजपा ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत भाजपा नगरसेवकांची शुक्रवारी (दि.31) सकाळी 11 वाजता बैठक बोलविण्यात आली असून, या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले आहे.