Wed, Jun 26, 2019 23:30होमपेज › Nashik › बंदी झुगारून नाशिकमध्ये तांगा शर्यती

बंदी झुगारून नाशिकमध्ये तांगा शर्यती

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाने घातलेली बंदी झुगारुन नाशिक जिल्ह्यातील चांदगिरी या गावी शनिवारी (दि.31) घोडा आणि बैल जोडीच्या तांगा शर्यती रंगल्या. शर्यतींना विरोध करीत या घटनेचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करणाऱ्या आवास संघटनेच्या प्राणीमित्रावर टोळक्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. यात प्राणीमित्र गौरव क्षत्रिय जखमी झाले असून, बिटको रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 
नाशिक-पुणे महामार्गालगतच्या चांदगिरी या गावात शनिवारी घोडाबैल तांगा शर्यती सुरू असल्याबाबत आवास या संघटनेला माहिती समजली. त्यानुसार संघटनेचे अध्यक्ष क्षत्रिय यांनी घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी मोठ्या गाजावाजात सुरू असलेल्या या शर्यतींना क्षत्रिय यांनी विरोध दर्शविला. तसेच सुरू असलेल्या तांगा शर्यतींचे मोबाइलमध्ये चित्रीकरण करण्यास सुरूवात केली. यावेळी काही जणांचा घोळका क्षत्रिय यांच्या दिशेने धाव घेत आला. काहींनी क्षत्रिय यांच्यावर धावून जात त्यांना मारहाण केली. झटापटीत क्षत्रीय यांचे कपडे फाटले.  कसाबसा जीव वाचवण्यासाठी  क्षत्रिय व त्यांच्या सहकाऱ्याने दुचाकीवरून पळ काढला. यावेळी टोळक्याने क्षत्रीय यांच्या दिशेने दगडफेकही केली. काही जणांच्या टोळक्याने सात ते आठ कि.मी.पर्यंत क्षत्रिय यांचा पाठलाग केला.

क्षत्रिय यांनी थेट नाशिकरोड पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार कथन केला. यावरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडफेकीत डोक्याला मार लागल्याने जखमी झालेले क्षत्रीय यांच्यावर नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच न्यायालयाची बंदी झुगारून तांगा शर्यती घेतल्यामुळे आयोजकांविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
 


  •