Sun, Aug 25, 2019 12:26होमपेज › Nashik › नाशिक जिल्ह्यातील आंदोलन स्थगित

नाशिक जिल्ह्यातील आंदोलन स्थगित

Published On: Aug 11 2018 1:21AM | Last Updated: Aug 12 2018 1:02AMनाशिक : प्रतिनिधी

सकल मराठा समाज राज्य समन्वय समितीकडून आंदोलनाचा पुढील निर्णय येईपर्यंत जिल्ह्यातील आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोेषणा सकल मराठा समाज जिल्हास्तरीय समितीच्या पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी (दि.10) पत्रकार परिषदेत केली. या काळात हिंसक आंदोलन केल्यास त्याची जबाबदारी सकल मराठा समाजाची नसेल, असे स्पष्ट करतानाच आरक्षणासाठी उच्च न्यायालयात लढा देण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. दरम्यान, नाशिकमध्ये राज्य समन्वय समितीची बैठक घेण्याबाबतही प्रयत्न सुरू असल्याची माहिती समितीमार्फत देण्यात आली. 

आरक्षणाच्या मुद्यावरून सकल मराठा जिल्हा समितीतर्फे गुरुवारी (दि. 9) ठिय्या आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा समितीची शुक्रवारी (दि. 10) तातडीची बैठक बोलविण्यात आली. या बैठकीनंतर पदाधिकार्‍यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्य समितीकडून पुढील आंदोलनाची दिशा मिळेपर्यंत जिल्ह्यातील आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या काळात जिल्ह्यात कोणी हिंसाचार केल्यास अशा घटनांची जबाबदारी समाजाची नसेल, असेही पदाधिकार्‍यांनी सांगितले.  नाशिकमध्ये गुरुवारी आंदोलनादरम्यान, हिंसाचार करणार्‍यांचा समाजातर्फे शोेध घेण्यात येईल. तसेच आंदोलनावेळी शहरात दुकाने बंद करण्याचे आवाहन करणार्‍या समाजबांधवांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती पोलीस प्रशासनाला केली जाईल. मात्र, यावेळी जाळपोळ, दगडफेक तसेच लूट करणार्‍यांच्या पाठीशी समाज उभा राहणार नसल्याची ठाम भूमिकाही पदाधिकार्‍यांनी जाहीर केली. आरक्षणाबाबत राज्यस्तरीय समन्वय समिती विविध प्रयत्न करत आहे.

राज्याच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी राज्य समन्वय समितीची बैठक येत्या पंधरवड्यात घेण्यासंदर्भातही प्रयत्न सुरू असल्याचे पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केले. मात्र, या काळात नाशिक जिल्ह्यातर्फे आरक्षणासाठीचा न्यायालयीन लढा सुरूच ठेवण्यात येईल. त्यासाठी उच्च न्यायालयात इंटरव्हेन्शन अ‍ॅप्लिकेशन (हस्तक्षेप याचिका) दाखल केले जाणार असून, न्यायालयात बाजू मांडण्यासाठी समितीमार्फत वकील नेमण्यात येतील, असेही पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी आमदार माणिक कोकाटे, समितीचे जिल्हाध्यक्ष सुनील बागूल, चंद्रकांत बनकर, करण गायकर, गणेश कदम, अ‍ॅड. शिवाजी सहाणे, तुषार जगताप आदी उपस्थित होते.