Fri, Dec 13, 2019 18:29होमपेज › Nashik › ‘मुथूट’ दरोड्यात गोळीबार करणारा संशयित गजाआड

‘मुथूट’ दरोड्यात गोळीबार करणारा संशयित गजाआड

Published On: Jun 26 2019 1:39AM | Last Updated: Jun 25 2019 11:44PM
नाशिक : प्रतिनिधी

उंटवाडी रोडवरील मधुरा टॉवरमधील मुथूट फायनान्समध्ये गोळीबार करून दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणार्‍या टोळीतील दुसरा संशयित परमेंदर सिंह (31, रा. उत्तर प्रदेश) यास गुजरात येथील कडोदरा भागातून अटक करण्यात आली आहे. परमेंदर यानेच ऑडिटर साजू सॅम्युएलवर गोळीबार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील संशयित आरोपींची संख्या 11 झाली आहे. सहा संशयित प्रत्यक्ष दरोड्यात सहभागी होते, उर्वरित पाच जणांनी रेकी करण्यासोबतच अन्य प्रकारे गुन्हेगारांना मदत केल्याचे उघडकीस आले आहे. 

परराज्यातील सहा दरोडेखोरांनी दि. 14 जून रोजी नाशिकमधील मुथूट फायनान्स येथे दरोडा टाकला. मात्र, कार्यालयातील ऑडिटर साजू सॅम्युएल यांनी दाखवलेल्या धाडसामुळे दरोडेखोरांचा बेत फसला. त्यामुळे सॅम्युएल यांच्यावर गोळ्या झाडून दरोडेखोर पसार झाले होते. दरोडेखोरांनी वापरलेल्या दुचाकींवरून पोलिसांनी त्यांचा माग काढला. सर्वप्रथम या दरोड्यातील मुख्य संशयित जितेंद्र विजयबहाद्दूरसिंह राजपूत यास गुजरातमधून अटक केली. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने मंगळवारी (दि.25) पहाटेच्या सुमारास सॅम्युएल यांच्यावर गोळ्या झाडणार्‍या परमेंदरलाही कडोदरा येथून अटक केली आहे. परमेंदर याने पोलीस तपासात अनेक धक्कादायक माहिती दिली. 

सॅम्युएलवर आकाश राजपूत यानेही गोळीबार केल्याचे सांगत कारागृहात असलेल्या सुबोधसिंग याच्या सांगण्यावरून मुथूट फायनान्स येथे दरोडा टाकल्याचे परमेंदर याने सांगितले. त्यामुळे या गुन्ह्यातील संशयितांची संख्या वाढली आहे. संशयितांनी दरोडा टाकण्याआधी शहराची आणि मुथूट फायनान्सची रेकी केली. संशयितांना वास्तव्य व इतर प्रकारच्या मदतीसाठी अन्य  पाच संशयितांनी मदत केल्याचे परमेंदर याच्याकडील चौकशीतून उघड झाले आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील संशयितांची संख्या 11 झाली आहे. न्यायालयाने परमेंदरला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आठ ते दहा तास पाळत : परमेंदर हा गुजरात राज्यातील कडोदरा येथे उत्तर भारतीय बहुल वस्तीत राहत होता. हा परिसर सतत गजबजलेला असल्याने पोलिसांना परमेंदर यास पकडणे कठीण झाले होते. प्रत्येक दहा मिनिटांनी परमेंदर त्याचे स्थान बदलत असल्याने त्याचा निश्‍चित ठिकाणा मिळत नव्हता. अखेर मंगळवारी (दि.25) पहाटेच्या सुमारास परमेंदरला त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. 

‘रिवॉर्ड’ची रक्कम धाडसी सॅम्युएलला : या गुन्ह्याची उकल करण्यासाठी शहर पोलिसांनी परिश्रम घेतल्याने पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या वतीने तिन्ही पथकास प्रत्येकी 70 हजार रुपये असे एकूण दोन लाख 10 हजार रुपयांचे रिवॉर्ड जाहीर करण्यात आले होते. मात्र, नाशिक पोलिसांनी रिवॉर्डची संपूर्ण रक्कम दरोडेखोरांना धाडसाने विरोध करणार्‍या सॅम्युएल यांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे.