Mon, May 20, 2019 18:21होमपेज › Nashik › जिल्हाधिकारी कार्यालयात बंगालीबाबाचा डेरा

जिल्हाधिकारी कार्यालयात बंगालीबाबाचा डेरा

Published On: Jun 05 2018 1:17AM | Last Updated: Jun 04 2018 11:34PMनाशिक : प्रतिनिधी

कोई भी दर्द या बिमारी हो.. इस मछली से सब तकलीफ दुर हो जायेंगी! सिर्फ सौ रुपये में दर्द का इलाज।  बंगालीबाबाचे हे वाक्य गोदाकाठी किंवा एखाद्या बसस्थानकाच्या आवारातील नाही. तर चक्‍क जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील आहे. ज्यांच्यावर अंधश्रद्धा दूर करण्याची जबाबदारी आहे त्याच प्रशासनाच्या नाकावर टिच्चून या बंगालीबाबाने सोमवारी (दि.4) कार्यालयाच्या आवारात डेरा टाकला. नुसताच डेरा टाकला नाही तर सोबत असलेल्या माशाच्या मणक्यांची विक्री करत पैसा कमविला. 

सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास दोन बंगालीबाबांनी कार्यालयाच्या आवारात प्रवेश केला. या बाबांनी जिल्हाधिकार्‍यांचे वाहन उभे केले जाणार्‍या जागेच्या शेजारील झाडाखालीच त्यांचे अंधश्रद्धेचे दुकान मांडले. या बाबानेे बटणाच्या आकाराचे माशाचे मणके विक्रीसाठी आणले होेते. शरीराचा जो भाग दुखत असेल किंवा जुना आजार असेल अशा ठिकाणी माशाचा मणका स्पर्श होईल अशा पद्धतीने बांधल्यास आजार दूर पळतो, असा दावा या बाबाकडून केला जात होता. दरम्यान, माशाचा एक मणका घेतल्यास 40 रुपये तसेच तीन मणके शंभर रुपयांना विक्री केले जात होते. विशेष म्हणजे या बाबाकडून 15 ते 20 नागरिकांनी या वस्तू विकत घेतल्या.

मुळातच अंधश्रद्धा निर्माण करणे व पसरविणे हा कायद्याने गुन्हा. असे प्रकार रोखण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनासह पोलीस व सर्व विभागांची असते. मात्र, जिल्ह्याच्या मुख्यालयातच दिवसाढवळ्या अंधश्रद्धेचा हा खेळ मांडला गेला. त्याची माहिती खुद्द जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासह इतर अधिकार्‍यांना न लागणे ही अत्यंत खेदाची बाब आहे. 

एरवी खुट्ट वाजले तरी पोलीस बंदोबस्त मागविणार्‍या जिल्हाधिकारी कार्यालयाची सद्यपरिस्थिती म्हणजे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच झाली आहे. महाविद्यालयीन युवक-युवती, कपल, तसेच विक्रेते बिनदिक्कतपणे कार्यालयाच्या आवारात वावरत असतात. यामुळे कार्यालयात काम घेऊन येणार्‍या नागरिकांना अनेकदा त्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. दरम्यान, या परिसरात मद्याच्या बाटल्याही नेहमीच नजरेस पडतात. हे सर्व प्रकार रोखण्यात प्रशासन कुचकामी ठरले आहे. अशावेळी सोमवारी घडलेल्या अंधश्रद्धेच्या बाजारावरून तर प्रशासनाची उरलीसुरली अब्रू वेशीवर टांगली गेली आहे.