Wed, Apr 24, 2019 21:28होमपेज › Nashik › कमोदनगर येथे होणार भुयारी मार्ग

कमोदनगर येथे होणार भुयारी मार्ग

Published On: Aug 31 2018 1:40AM | Last Updated: Aug 30 2018 11:57PMसिडको : प्रतिनिधी

कमोदनगरजवळ उड्डाणपुलावरून रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातात माय-लेकाचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (दि.30) संतप्त नागरिकांनी मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने तातडीने कमोदनगर येथे भुयारी मार्ग उभारण्यात येणार असून, शुक्रवार (दि.31) पासून भुयारी मार्गाचे काम सुरू होणार असल्याचे आश्‍वासन खा. हेमंत गोडसे यांनी दिल्याने नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. दरम्यान,कमोदनगर येेथे बुधवारी (दि.29) रात्री  झालेल्या अपघातात आई व मुलगा ठार झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या घटनेनंतर   खा. हेमंत गोडसे यांनी गुरुवारी दुपारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी रास्ता रोको करून परिसरातील नागरिकांनी निषेध व्यक्त केला. नागरिकांनी खा. गोडसे यांना घेराव घालून भुयारी मार्गाची मागणी केली. या भुयारी मार्गाला केंद्रीय रस्ते वाहतूक विकास मंत्री नितीन गडकरी यांनी निधी मंजूर करूनही कामाला सुरुवात होत नसल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अखेर नागरिकांचा रोष पाहून खा. गोडसे यांच्यासह महामार्ग प्रशासनाने काम सुरू करणार असल्याचे सांगितले.

यावेळी कमोदनगर मित्र मंडळाचे तुळशीदास बैरागी, अध्यक्ष अजय निफाडे, संतोष खंबळवार, सागर पाटील, देवयानी मदाने, गौरी आहेर, मीना घोलप, दिपक जुनागडे, जगन्नाथ निकम, अशोक शिंदे, सुनीता कुलकर्णी यांच्यासह असंख्य नागरिक रास्ता रोको प्रसंगी उपस्थित होते.

खा.गोडसे यांनी दिलल्या आश्‍वासनानुसार भुयारी मार्गाचे काम सुरू न झाल्यास  उड्डाणपूल फोडण्यात येईल अथवा रस्ता बंद करण्यात येईल, असा इशारा संघर्ष समिती आणि नगरसेविका कल्पना पांडे यांनी दिला आहे.