Tue, Apr 23, 2019 06:12होमपेज › Nashik › महापालिका कर्मचार्‍यांचा आयुक्‍तांविरुद्ध संपाचा इशारा

महापालिका कर्मचार्‍यांचा आयुक्‍तांविरुद्ध संपाचा इशारा

Published On: Aug 09 2018 1:36AM | Last Updated: Aug 09 2018 1:36AMनाशिक : प्रतिनिधी

मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी 15 दिवसांत आपला कारभार सुधरविला नाही आणि कर्मचार्‍यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास संपावर जाण्याचा इशारा मनपाच्या सर्व कर्मचारी, कामगार संघटनांनी बुधवारी (दि.8) सायंकाळी झालेल्या द्वारसभेत दिला. दरम्यान, कर्मचारी संघटनांनी बोलविलेल्या द्वारसभेला महापौरांसह नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांनी हजेरी लावत आयुक्‍तांच्या कारभारावर टीका करत प्रसंगी आयुक्‍तांवर अविश्‍वास ठराव दाखल करण्याचे संकेत दिले. गुरुवारी (दि.9) सर्व संघटनांमार्फत पोलीस आयुक्‍तांची भेट घेऊन सहायक अधीक्षक संजय धारणकर यांच्या आत्महत्येप्रकरणी आयुक्‍तांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन देण्याचा निर्णय घेतला. 

मनपाच्या विविध कर्मचारी संघटनांचे कर्मचारी, पदाधकारी तसेच मनपाचे पदाधिकारी आणि नगरसेवकांनी बुधवारी (दि.8) द्वारसभेत प्रथमच एकत्र येऊन मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांच्या कारभाराचा निषेध नोंदविला. द्वारसभेला महापौर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके आहेर, उपमहापौर प्रथमेश गिते, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, संभाजी मोरुस्कर, शाहू खैरे, माजी महापौर अशोक दिवे, कामगार नेते डॉ. डी. एल. कराड, नगरसेवक डी. जी. सुर्यवंशी, जगदीश पाटील, वत्सला खैरे, सत्यभामा गाडेकर, जगदीश पाटील, कल्पना पांडे, नयना गांगुर्डे, पश्‍चिम प्रभाग सभापती वैशाली भोसले तसेच कर्मचारी संघटनांचे प्रवीण तिदमे, अ‍ॅड. तानाजी जायभावे, संदीप भवर, अनिल बहोत, जीवन लासूरे, राजेंद्र मोरे, रमाकांत क्षीरसागर, सुरेश मारू, संतोष वाघ, रमेश उदावंत, लाला अहिरे आदी उपस्थित होते.

नगरसेवक आणि कर्मचारी एकत्र येऊन आयुक्‍तांचा अन्याय मोडीत काढू. महापौरांनी धारणकर कुटूंबांची भेट घेतली तेव्हा धारणकर हे गेल्या दोन महिन्यांपासून तणावाखाली असल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितल्याचे भाजपा गटनेते मोरूस्कर यांनी यावेळी सांगत प्रशासनाच्या दहशतीला संपविण्याची वेळ आता आल्याचा इशारा दिला. दहशत, भय निर्माण केले जात आहे. आता कर्मचार्‍यांनी रडण्यापेक्षा लढण्याचा निश्‍चय करा. देवतांच्या प्रतिमा लावू नका, जयंतीचे कार्यक्रम खाली न घेता वरच्या हॉलमध्ये घ्या हे प्रशासनाचे काम नाही, असे सांगत विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी प्रशासनाचे डोके ठिकाणावर राहिलेले नसल्याचा आरोप केला.

प्रशासनाकडून मिळणार्‍या नोटीस, निलंबन अशा कारवायांना कर्मचार्‍यांनी घाबरू नये. संपूर्ण शहराबरोबरच कर्मचार्‍यांना वेठीस धरून आपला हुकूम चालविण्याचा प्रकार आयुक्‍तांकडून सुरू आहे. यामुळे आयुक्‍तांना वेळीच रोखण्याची वेळ आता आली असून, सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन 36 (3) चा ठराव करून आयुक्‍तांना घरी जाऊ द्या, अशी सुचना प्रवीण तिदमे यांनी उपस्थित सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांकडे पाहत केली. 15 दिवसात आयुक्‍तांनी आपला कारभार न सुधारल्यास कामंबद आंदोलन करू आणि आयुक्‍तांनाही महापालिकेत जाऊ देणार नाही, असा इशाराही तिदमे यांनी दिला. 

धारणकर यांचा मृत्यू दुर्देवी आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्‍त रवींद्रकुमार सिंगल यांच्याशी चर्चा झाली असून, सर्व निर्णयप्रक्रियेत मी कर्मचारी संघटना आणि नाशिककरांबरोबर असल्याची ग्वाही महापौर रंजना भानसी यांनी दिली. कर्मचार्‍यांनी अजिबात घाबरून जाऊ नये. कारण प्रशासनाकडून होणार्‍या प्रत्येक शास्ती माफ करण्याचा अधिकार मनपा महासभा आणि स्थायी समितीला असल्याचे शाहू खैरे यांनी सांगितले. कर्मचारी आणि नगरसेवक देखील आयुक्‍तांच्या कारभाराला घाबरलेली आहे. महासभा हीच सर्वोच्च आहे. यामुळे कर्मचार्‍यांवर होणार्‍या शास्तीचे ठराव नामंजूर करा. आयुक्‍त कुणाला घाबरत नाही तर मग पोलीस संरक्षणात का असतात असा प्रश्‍न माजी महापौर अशोक दिवे यांनी उपस्थित केला. 

कर्मचार्‍यांनी द्वारसभा बोलविताच आयुक्‍त दौर्‍यावर निघून गेले. महासभेचा ठराव आयुक्‍तच काय कोणीच बदलू शकत नाही अगदी शासन देखील. आणि तशी वेळ आलीच तर उच्च न्यायालयात आपण जाऊ असा इशाराही दिवे यांनी दिला. आयुक्‍त हेच मोठे भ्रष्टाचारी असून, येत्या काळात पुराव्यानिशी आपण स्पष्ट करणार असल्याचे दिवे यांनी सांगितले. 25-25 कोटींचे एकत्रित निविदा आयुक्‍त कसे काढतात असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.  

तर आयुक्‍तांना कार्यालयात बसवा 

कायद्यापेक्षा कोणी मोठे नाही. आयुक्‍तांनी आपली हटवादी आणि दादागिरी संपवली नाही तर कामबंद आंदोलनाचे हत्यार आपल्याकडे असल्याचे कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांनी सांगत मुख्यमंत्र्यांवरही आरोप केले. नाशिककरांच्या मानगुटीवर आयुक्‍त नावाचे भूत आणून बसविले आहे. मुख्यमंत्र्यांना आयुक्‍त इतकेच प्रिय असतील तर त्यांनी त्यांना आपल्या कार्यालयात बसवावे, असा उपरोधिक टोलाही कराड यांनी लगावला.