Mon, May 27, 2019 08:42होमपेज › Nashik › विशेष सरकारी वकील मिसर यांना जीवे मारण्याची धमकी

विशेष सरकारी वकील मिसर यांना जीवे मारण्याची धमकी

Published On: Jul 13 2018 12:50AM | Last Updated: Jul 12 2018 11:58PMनाशिक : विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्या जिवाला धोका असून, त्यांना जिवे मारण्याचा कट मध्यवर्ती कारागृहातील मोक्का कायद्यातील कैदी करीत असल्याच्या आशयाचे पत्र कारागृह प्रशासनास मिळाले आहे. त्यामुळे अ‍ॅड. मिसर यांच्या सुरक्षिततेत वाढ करण्यात आली असून, पोलिसांकडूनही या पत्राची गांभीर्याने दखल घेतली असून संशयितांचा शोध सुरू केला आहे. 

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील प्रवेशद्वार 1 आणि 2 यांच्यामध्ये पेटी ठेवण्यात आली आहे. या पेटीत कारागृहातील कैदी त्यांच्या तक्रारी लेखी स्वरुपात देत असतात. त्या तक्रारींची शहानिशा करून कारागृह प्रशासनामार्फत कार्यवाही केली जात असते. 2 जुलै रोजी नेहमीप्रमाणे तुरुंगाधिकारी राजकुमार साळी यांनी साप्‍ताहिक फेरीदरम्यान, पेटी तपासली.त्यात एक निनावी पत्र आढळले असून, पत्र लिहिणार्‍याने स्वत:ची ओळख न्यायालयीन बंदी असल्याची केली आहे. या कैद्याने पत्रात लिहिले आहे की, तो ज्या बराकीत आहे त्या बराकीत इतर 70 ते 80 बंदी आहेत. त्यात अनेक बंदी मोक्कामधील असून, त्यांच्यामध्ये अ‍ॅड. मिसर यांना जिवे मारण्याच्या चर्चा होत आहे. जोपर्यंत अ‍ॅड. मिसर हे आपली केस लढत आहेत तोपर्यंत आपली निर्दोष सुटका होणे अवघड आहे. त्यामुळे अ‍ॅड. मिसरचा ‘गेम’ करणे आवश्यक असल्याचा संवाद ऐकल्याचा उल्लेख या पत्रात आहे. तसेच, पत्र लिहिणार्‍यानेही त्याची ओळख गुप्‍त ठेवली आहे. हे पत्र पोलीस आयुक्‍त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना देण्यात आले असून त्या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. तसेच, अ‍ॅड. मिसर यांच्या सुरक्षेतही वाढ केली आहे. या प्रकरणाची महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनीही गंभीर दखल घेतली आहे.