नाशिक : प्रतिनिधी
नगर जिल्ह्यातील सोनई येथील प्रेमप्रकरणातून तिहेरी हत्याकांडात सोमवारी (दि. १५) जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव यांनी सहा आरोपींना दोषी ठरवले आहे. त्यांना गुरुवारी (दि.१८) शिक्षा सुनाण्यात येणार आहे. यामधील सातवा संशयित अशोक रोहिदास फलके यास पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले आहे.
सोनई येथील गणेशवाडी शिवारात डिसेंबर २०१३ मध्ये ही घटना घडली होती. प्रेमप्रकरण असल्याच्या कारणावरून पोपट उर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले व कुटुंबातील इतर सदस्यांनी सचिन सोहनलाल घारू याचा काटा काढण्याचा बेत आखला. त्यानुसार शौचालयाची टाकी साफ करण्याच्या बहाण्याने सचिनसह संदीप राजू थनवार, सागर उर्फ तिलक राजू कंडारे यांना दरंदले वस्तीवर बोलवले. तेथे तिघांचाही निर्घृन खून करण्यात आला. याप्रकरणी पोपट उर्फ रघुनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, प्रकाश विश्वनाथ दरंदले, गणेश उर्फ प्रवीण पोपट दरंदले, संदीप माधव कुल्हे, अशोक सुधाकर नवगिरे, अशोक रोहिदास फलके यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या खटल्याची सुनावणी नाशिक जिल्हा न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे ॲड. उज्ज्वल निकम यांनी युक्तीवाद केला. त्यानंतर सुनावणी पूर्ण झाल्याने सोमवारी निकाल ठेवण्यात आला होता. यामध्ये सहा आरोपीविरोधात परिस्थितिजन्य पुरावे आढळल्याने दोषी ठरवण्यात आले. दरम्यान, सुनावणी सुरु असताना एकाने न्यायालयात शिवीगाळ केली.