नाशिक : प्रतिनिधी
सोलापूरहून एका अपघातात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाचे यकृत ग्रीन कॉरिडॉरद्वारे सहा तासांत नाशिकला पोहोचले. त्यामुळे नाशिकच्या सह्याद्री सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथील यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि ३१ वर्षाच्या तरूण रुग्णाला जीवनदान मिळाले.
सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटल येथील ब्रेन डेड रुग्णाचे यकृत दान करण्याची तयारी रुग्णाच्या नातेवाईकांनी दाखवली. त्यानंतर तातडीने सोलापूर ते नाशिक ग्रीन कॉरिडॉर करुन शनिवारी (दि. ८) रात्री ८.३० च्या सुमारास प्रत्यारोपणासाठी यशस्वीरीत्या नाशिक येथील सह्याद्री सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलला पोहोचले.
शेवटच्या टप्प्यातील यकृताच्या आजाराने त्रस्त रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी सोलापूर - नाशिक महामार्गावर तत्काळ ग्रीन कॉरिडॉर करण्यात आले. झोनल ट्रान्सप्लांट कॉर्डिनेशन कमिटी व सोलापूर, पुणे, नगर, नाशिक पोलिसांच्या समन्वयामुळे सोलापूर ते नाशिक हे अंतर अवघ्या सहा तासात पूर्ण करण्यात आले. सहसा हे अंतर पार करण्यासाठी आठ ते नऊ तासांचा कालावधी लागतो.
अवयवदान करणार्या सोलापुरातील १९ वर्षीय तरुणाचा रस्त्यावरील अपघातानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याला शनिवारी (दि. 8) ब्रेन डेड घोषित करण्यात आले. रुग्णाच्या कुटुंबाच्या सदस्यांनी स्वतःहून अवयवदानाची इच्छा व्यक्त केली. झोनल ट्रान्सप्लांट कॉर्डिनेशन कमिटीच्या आवश्यक मंजुरीनंतर सह्याद्री रुग्णालयाच्या कुशल वैद्यकीय पथकाने ३१ वर्षीय रुग्णावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली.
सह्याद्री हॉस्पिटलच्या डॉ. विपिन विभुते (प्रत्यारोपण व हिपॅटोबिलरी सर्जन) यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या ही शस्रक्रिया करण्यात आली. सह्याद्री हॉस्पिटल समूहाच्या रुग्णालयात मागील सहा महिन्यांत 100 पेक्षा अधिक प्रत्यारोपण शस्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या असल्याचे डॉ. विपिन विभुते यांनी सांगितले. अचूकता व शस्रक्रियेचा यशस्वी दर यामुळे अधिकाधिक रुग्णांना फायदा होत आहे.