Fri, Nov 16, 2018 10:51होमपेज › Nashik › स्मार्ट सिटी कंपनी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आहे का?

स्मार्ट सिटी कंपनी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आहे का?

Published On: Jul 13 2018 12:50AM | Last Updated: Jul 12 2018 11:45PMनाशिक : प्रतिनिधी

स्मार्ट कंपनीच्या संचालकांनी स्मार्ट सिटी योजनेतील विकासकामांची पाहणी केल्यानंतर स्थानिक नगरसेवकांनी नाराजी व्यक्‍त केली असून, स्मार्ट सिटी कंपनी म्हणजे काय ईस्ट इंडिया कंपनी आहे का, अशी टीका पश्‍चिम प्रभाग समितीच्या सभापती वैशाली भोसले यांनी केली आहे. 

स्मार्ट सिटी योजनेतील पहिल्या टप्प्यातील बहुतांश सर्वच कामे ही जुने नाशिक भागात होत आहेत. यातील बरीचशी कामे अंतिम टप्प्यात असल्याने बुधवारी (दि.11) संचालक मंडळाने या कामांचा पाहणी दौरा आयोजित केला होता. परंतु, या दौर्‍यात संबंधित संचालकांसह स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकार्‍यांनी स्थानिक नगरसेवकांना बोलविले नाही. ज्या नगरसेवकांच्या प्रभागात ही कामे होत आहे त्यांनाही त्याची कल्पना नसल्याने नगरसेवक शाहू खैरे, गजानन शेलार, वत्सला खैरे व वैशाली भोसले यांनी नाराजी व्यक्‍त करत प्रशासनाची ही मनमानी आपण खपवून घेणार नाही असा इशारा दिला आहे. 

प्रशासनातील काही अधिकार्‍यांचा समज आहे की त्यांनाच खूप ज्ञान आहे. परंतु, संबंधित बाहेरून आलेल्या अधिकार्‍यांनी नाशिकच्या प्रश्‍नी जनता आणि नगरसेवकांना काय हवे याचाच विचार करावा. आपली मनमानी करू नये. यामुळे आपल्यालाच सर्व कळते आणि नगरसेवकांना काही कळत नाही या समजुतीत अधिकार्‍यांनी राहू नये, असे बोलही सभापती वैशाली भोसले यांनी सुनावले. स्थानिक नगरसेवकांना विश्‍वासात न घेता कामे केल्यास यापुढे ते अजिबात सहन केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.